अल्वरभारतातील सर्व रेल्वे स्थानकांवरुन आता चहाचे प्लास्टिकचे कप इतिहास जमा होणार आहेत. कारण त्याची जागा आता पर्यावरणपूरक कुल्हड घणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे. ते राजस्थानमधील अल्वर जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलत होते.
"देशातील सध्या ४०० रेल्वे स्थानकांवर कुल्हडमधून चहा दिला जात आहे. पण प्लास्टिकमुक्त भारतच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकत लवकरच देशातील सर्वच रेल्वे स्थानकांवर प्लास्टिक कपच्या जागी कुल्हड उपलब्ध करुन देण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. यातून अनेकांना रोजगार देखील मिळेल", असं पियूष गोयल म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लास्टिकमुक्त भारताचे आवाहन केले आहे. याअंतर्गत रेल्वेकडून कोणते बदल केले जाऊ शकतात याचे सर्व प्रयत्न केले जात असल्याचंही गोयल म्हणाले. रेल्वेच्या या धोरणामुळे पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होईल. देशातील सर्वच रेल्वे स्थानकांवर कुल्हडमधून चहा दिल्यास प्लास्टिक कपची मागणी कमी होईल. परिणाम प्लास्टिक कपच्या निर्मितीवरही आळा घालता येईल, असा यामागचा हेतू आहे.