नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्रातील सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांच्या हस्ते मोदींचा सन्मान करण्यात आला. पॉलिसी लिडरशीप या कॅटेगिरीतून मोदींना हा पुरस्कार दिला गेला आहे. दिल्लीत हा कार्यक्रम झाला असून, मोदींनी या कार्यक्रमाला संबोधित केलं आहे. मोदी म्हणाले, भारत हा प्रकृतीला आईच्या रूपात पाहतो. हा आदिवासी, शेतकरी आणि मच्छीमारांचा सन्मान आहे. या सर्वांचं आयुष्य हे प्रकृती नियमानुसारच सुरू आहे. भारतात महिलेचा सन्मान केला जातो. जी झाडांची निगा राखते. पर्यावरणाच्या समस्येचं गांभीर्य जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत ती समस्या संपणार नाही. आम्ही प्रकृतीला सजीव मानलं आहे.पर्यावरणाच्या बाबतीत भारताच्या संकल्पनेला आज जगानं स्वीकारलं आहे. पण हे हजारो वर्षांपासून आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग राहिला आहे. आज आमच्या देशात गरिबांची संख्या कमी होत चालली आहे. दारिद्र्यरेषेखालील लोक वर येत आहेत. पर्यावरण आणि प्रकृतीवर अतिरिक्त दबाव न टाकताही विकास करता येऊ शकतो. त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पर्यावरणाची समस्या Climate Justice शिवाय सोडवता येऊ शकत नाही. जगातल्या वेगानं शहरीकरण होणा-या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. त्यातच शहरी जीवनाला स्मार्ट आणि अनुकूल बनवण्यासाठी बळ मिळतंय.
पर्यावरणाची समस्या Climate Justiceशिवाय सोडवता येऊ शकत नाही- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 2:39 PM