नवी दिल्ली - वित्त वर्ष २०२२-२३ साठी कर्मचारी भविष्य निधीचा (ईपीएफ) व्याजदर ०.१ टक्क्याने कमी करून ८.०० टक्के केला जाण्याची शक्यता आहे. आदल्या वर्षी तो ८.१ टक्के होता. सूत्रांनी सांगितले की, २०२१-२२ या वित्त वर्षाप्रमाणे ८.१ टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा प्रस्तावही केंद्र सरकारच्या विचाराधीन असला तरी, ८.०० टक्के व्याजदरावर सहमती होण्याची शक्यता अधिक असल्याची माहिती हाती येत आहे.
उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) व्याजदरावर काम करीत आहे. व्याजदराचा अंतिम निर्णय मात्र ईपीएफओचे विश्वस्त मंडळच घेईल. त्यासाठी सीबीटीची एक बैठक या महिन्याच्या अखेरीस अथवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.
...तर ठरेल नीचांकी दर२०२१-२२ मधील ८.१ टक्के व्याजदर हा ४ दशकांतील सर्वांत कमी व्याजदर ठरला होता. १९७७-१९७८ मध्ये ८.०० टक्के व्याजदर होता. २०२०-२१ साठी ८.५ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला होता. ८ टक्के व्याजदर ठेवल्यास तो ४ दशकांतील नीचांकी ठरेल.