नवी दिल्ली - केंद्र सरकार ईपीएफओच्या पेन्शन स्कीममधील सब्स्क्रायबर्सना एक शानदार भेट देण्याच्या तयारीत आहे. या स्कीममध्ये मिळणाऱ्या मिनिमम पेन्शनमध्ये आता ९ पट वाढ करण्याची तयारी सुरू आहे. जर असे झाले तर ईपीएसशी संबंधित लोकांना दरमहा प्रत्येकी एक हजार रुपयांऐवजी ९-९ हजार रुपये मिळणार आहेत.
मिळत असलेल्या माहितीनुसार कामगार मंत्रालय याबाबत फेब्रुवारी महिन्यामध्ये होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊ शकते. याच बैठकीमध्ये नव्या वेज कोडबाबतही निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या बैठकीचा मुख्य अजेंडा कर्मचारी पेन्शन योजनेच्या अंतर्गत किमान पेन्शनमध्ये वाढ करणे हा असेल.
किमान पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी पेन्शनर्सकडून दीर्घकाळापासून करण्यात येत होती. याबाबत अनेक टप्प्यातील चर्चा आधीच झालेली आहे. संसदेच्या स्थायी समितीनेसुद्धा याबाबत सल्ला दिला आहे. किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय हा समितीच्या शिफारशींच्या आधारावर करण्यात येणार आहे, असे सांगण्यात येत आहे.
संसदेच्या स्थायी समितीने मार्च २०२१ मध्ये याबाबतचा सल्ला दिला होता. समितीने सांगितले की, किमान पेन्शनच्या रकमेला सध्याच्या एक हजार रुपयांवरून वाढवून ३ हजार रुपये केले गेले पाहिजे. मात्र पेन्शनर्सचे सांगणे आहे की, ही रक्कम ९ हजार रुपयांपर्यंत वाढवली पाहिजे. असे होईल तेव्हाच ईपीएस-९५ शी संबंधित पेन्शनर्सना योग्य अर्थाने फायदा मिळणार आहे.
एक सल्ला असाही आहे की, किमान पेन्शन ही संबंधित व्यक्तीच्या अंतिम पगारावरून निर्धारित व्हावी. निवृत्त होण्याच्या आधी कर्मचाऱ्याला जो अंतिम पगार मिळाला असेल त्यालाच आधार बनवून पेन्शन निश्चित केली गेली पाहिजे. कामगार मंत्रालयाने फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये याकडेही लक्ष दिले जाण्याची शक्यता आहे.