मुंबई, दि. 16 - दोन हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिन तस्करी प्रकरणी फरार असलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी दुबईला पसार झाल्याची माहिती आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे. 2000 कोटी रुपयांच्या इफेड्रीन तस्करीप्रकरणी ममता आणि तिचा पती विकी गोस्वामी हे दोघेही आरोपी आहेत. फेब्रुवारीमध्ये केनियातून अमेरिकेच्या ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशनने (DEA) विकी गोस्वामी आणि त्याचे तीन साथीदार इब्राहिम, बख्ताश आक्शा आणि पाकिस्तानी अमली पदार्थ वितरक गुलाम हुसैन यांना अटक केली होती. चौघांच्या अटकेवेळी ममताही घटनास्थळी होती. मात्र ती पोलिसांच्या हाती सापडली नाही. विकी गोस्वामीला अटक झाल्यानंतर लगेचचच ममताने केनिया सोडून दुबईला पळ काढल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. तर आता ती दुबईहून देखील पसार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिच्याविरोधात ठाणे पोलिसांकडून रेड कॉर्नर नोटीसही बजावली जाऊ शकते.वर्षभरापूर्वी ठाणे पोलिसांनी सोलापूर येथील एव्हॉन लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या फॅक्टरीवर छापा टाकून 2 हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिनची देश-विदेशात तस्करी करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड केला होता. ‘इफेड्रीन’च्या या तस्करीमध्ये ममता आणि तिचा पती विकी गोस्वामीचं नाव पुढे आलं होतं. या प्रकरणात ममता कुळकर्णी आणि विकी गोस्वामीचा सहभाग पोलिसांनी न्यायालयासमोर स्पष्ट केल्यानंतर त्यांच्याविरूद्ध तीनवेळा अटक वॉरंट बजावण्यात आले. अखेर ठाणे न्यायालयाने 6 जून रोजी ममता कुलकर्णीला फरार घोषीत केलं. केनिया आणि टांझानियात इफेड्रीनवर प्रक्रिया करून मेथ एन्फाटामाइन हा ‘आइस’ नावाचा मादक पदार्थ बनवून त्याची इतर देशांमध्ये तस्करी केल्याचा विकी आणि ममतावर आरोप आहे.
आतापर्यंत या प्रकरणी सोलापूरच्या ‘एव्हॉन लाइफ सायन्सेस लि.’ या कंपनीचा माजी संचालक मनोजजैनसह गुजरातच्या माजी आमदाराचा पुत्र किशोर राठोड, पुनीत श्रींगी आणि जयमुखी आदी १५ जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये दोन नायजेरियन नागरिकांचाही समावेश आहे. जैन याच्यासह १५ जणांविरुद्ध ठाणे जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. जैन आणि कंपनीचा सल्लागार पुनीत श्रींगी यांनी कशा प्रकारे कोट्यवधी रुपयांच्या सुमारे १०० किलो इफेड्रीनची तस्करी केली, याबाबतचे अनेक पुरावे या आरोपपत्रात जोडले आहेत. जैन याने पुनीतसह या सर्वांना हाताशी धरून कंपनीतील इफेड्रीन बाहेर काढले. आंतरराष्ट्रीय ड्रगमाफिया विकीच्या मदतीने केनिया तसेच दक्षिण अफ्रिकेत या मालाची तस्करी केली. हवालामार्फत त्यासाठी त्यांनी करोडो रुपये स्वीकारले. याशिवाय, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि सोलापूर आदी परिसरात इफेड्रीनची मोठी तस्करी केली. १४ एपिल २०१६ रोजी सोलापूरच्या एव्हॉन कंपनीवर पोलिसांनी छापे टाकून जयमुखी, विकी तसेच ममता कुलकर्णी यांच्याविरुद्ध पुरावे गोळा केले आहेत. याच पुराव्यांच्या आधारे आता ठाणे न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. इफेड्रीनच्या तस्करीत विकीसह ममताचाही सहभाग असून, ती अनेक बैठकांना त्याच्यासोबत हजर असल्याची माहिती जयमुखीच्या जबाबातून पोलिसांना मिळाली होती.
आणखी वाचा- (ममता कुलकर्णीच्या भूमिकेत सनी लिओन)