केरळमधील स्फोटात इन्सेंडरी डिव्हाईस आणि IED चा वापर; टिफिन बॉक्समध्ये ठेवलेले बॉम्ब
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 02:46 PM2023-10-29T14:46:43+5:302023-10-29T14:52:05+5:30
एर्नाकुलममधील कलामसेरी येथे असलेल्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रार्थना सुरू होती. या तीन दिवसीय परिषदेत शेकडो लोक उपस्थित होते.
केरळमधील एर्नाकुलम येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रार्थना सभेदरम्यान बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर 40 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच एनआयए आणि केरळ पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. या घटनेच्या प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की स्फोटांसाठी 'इन्सेंडरी डिव्हाईस' आणि 'इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस' म्हणजेच IED चा वापर करण्यात आला होता. हे स्फोटक टिफिन बॉक्समध्ये लपवून ठेवले होते, जेणेकरून कोणाला कळू नये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला स्फोट सकाळी 9.30 च्या सुमारास झाला. त्यानंतर एकापाठोपाठ तीन स्फोटांनी संपूर्ण कन्व्हेन्शन सेंटर हादरले.
मिळालेल्या माहितीनुसार, एर्नाकुलममधील कलामसेरी येथे असलेल्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रार्थना सुरू होती. या तीन दिवसीय परिषदेत शेकडो लोक उपस्थित होते. त्यानंतर मोठा स्फोट झाला, त्यानंतर एकच गोंधळ उडाला. या काळात मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. सर्व जखमींवर एर्नाकुलम मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. केरळ पोलीस आणि एनआयए पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि गृहमंत्री अमित शाह संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
इन्सेंडरी म्हणजे आग लावणारा किंवा स्फोटक असतो. आग वापरून संवेदनशील उपकरणे नष्ट करण्यासाठी याचा वापर केला जातो. कधीकधी एन्टी पर्सनल शस्त्र म्हणून देखील वापरला जातो. नेपलम, थर्माइट, मॅग्नेशियम पावडर आणि क्लोरीन ट्रायफ्लोराइडचा वापर आग लावणाऱ्या उपकरणांमध्ये केला जातो. हे पहिल्या महायुद्धामध्ये हे वापरले गेले. यानंतर दुसऱ्या महायुद्धातही याचा वापर झाला. अशा प्रकारची शस्त्रे बहुतेक लहान हल्ल्यांमध्ये वापरली जातात.
IED किती धोकादायक आहे?
IED म्हणजेच इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस हे असे बॉम्ब आहेत, जे लष्करी बॉम्बपेक्षा वेगळे आहेत. याचा वापर मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यासाठी केला जातो. त्याचा स्फोट होताच, घटनास्थळी अनेकदा आग लागते, कारण त्यात प्राणघातक आणि आग लावणारी रसायने वापरली जातात. जेव्हा या बॉम्बवर दबाव टाकला जातो तेव्हा स्फोट होतो. याला चालना देण्यासाठी, दहशतवादी आणि नक्षलवादी रिमोट कंट्रोल, इन्फ्रारेड किंवा मॅग्नेटिक ट्रिगर्स, प्रेशर सेन्सेटीव्ह बार्स किंवा ट्रिप वायर यांसारख्या पद्धती वापरतात. अनेक वेळा हे तारांच्या साहाय्याने रस्त्याच्या कडेला टाकले जातात. भारतात नक्षलवाद्यांकडून आयईडीद्वारे अनेक घटना घडवल्या जातात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.