नवी दिल्ली : घाणेरडे, अस्वच्छ ब्लँकेट्स दिले जात असल्याच्या तक्रारींनी त्रासलेल्या रेल्वे मंत्रालयाने ब्लँकेट्स जास्त वेळा धुण्याचा व जुन्यांच्या जागी वजनाने हलके व डिझायनर ब्लँकेट्स देण्याची योजना तयार केली आहे. अर्थात ही योजना टप्प्याटप्प्याने राबवली जाईल.जुने ब्लँकेट्स वापरण्यास देण्याच्या आधी नियमितपणे आरोग्यदायी (घाण व जंतुंपासून मुक्त-सॅनिटाईज) केले जातील. रेल्वेच्या नियमांनुसार ब्लँकेट्स दर एक किंवा दोन महिन्यांनी धुतले पाहिजेत परंतु कॅगच्या (कॉम्पट्रोलर अँड आॅडीटर जनरल) ताज्या अहवालात हे ब्लँकेट्स अस्वच्छ असतात व सहा-सहा महिने ते धुतले जात नाहीत, असे निदर्शनास आणून दिले गेले. तथापि, वास येणारे ब्लँकेट्स लवकरच इतिहास जमा होणार आहेत.रेल्वेने वजनाने हलके व ज्यात लोकरीचे प्रमाण कमी आहे, असे ब्लँकेट्स डिझाईन करायला नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन डिझाईनला सांगितले आहे. पातळ, थंड पाण्यात धुता येतील अशा ब्लँकेट्सची चाचणी मध्य रेल्वेने केलीही आहे. रेल्वेमध्ये प्रत्येक प्रवासात धुतलेले ब्लँकेट्स पुरवायचा आमचा उद्देश आहे, असे रेल्वेच्या अधिकाºयाने सांगितले. दोन महिन्यांनी ब्लँकेट्स धुतली जातात.
एसीतील प्रवाशांना रेल्वे देणार डिझायनर ब्लँकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 2:07 AM