नवी दिल्ली - सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का देण्याची तयारी केंद्र सरकराने केली आहे. कर्मचाऱ्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली. कोविड-१९ रिलिफ स्कीम मार्च महिन्यामध्ये बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) ने ही योजना २४ मार्च २०२० रोजी दोन वर्षांसाठी सुरू केली होती. तेव्हापासून ही योजना सुरू आहे. तिला या मार्च महिन्यामध्ये दोन वर्षे पूर्ण होणार आहेत.
कर्मचारी राज्य विमा निगमच्या गव्हर्निंग बॉडीची बैठक हल्लीच झाली होती. ईएसआयसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, कोरोनाची स्थिती आता नियंत्रणात आहे. अशा परिस्थितीत कोविडबाबतच्या मदत योजना पुढे सुरू ठेवण्याची गरज नाही. या बैठकीमध्ये कामगारमंत्र्यांनी सांगितले की, ईएसआयसी रुग्णालयांकडून श्रमिकांच्या आरोग्याची तपासणी सुरू राहील. तसेच फॅक्टरी-एमएसएमई क्लस्टरला एक युनिट मानले जाईल.
देशात कोरोनाचा फैलाव सुरू झालयावर ईएसआयसीअंतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांसाटी ही योजना सुरू करण्यात आली होती. कुठल्याही कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जात होती. दरम्यान, ईएसआयसीशी संबंधित असलेल्या सूत्रांच्या मते ही योजना अजून एक वर्ष सुरू राहावी, अशी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची माहिती होती. त्यांच्या मते कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. अजूनही देशात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. मात्र कामगार मंत्र्यांनी कोरोनाचा धोका आता तितकासा राहिला नसल्याचे सांगत आरोग्य मंत्र्यांनी ही योजना पुढे सुरू ठेवण्यास नकार दिला होता.