ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - एस्सार समूहाने २००१ ते २००६ पर्यंत एनडीए व युपीए सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांसह मुकेश व अनिल अंबानी, तसेच नोकरशहा व अनेक अतिमहत्वाच्या व्यक्तींचे फोन 'टॅप' केले, अशी तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली आहे. दिल्लीतील रहिवासी असलेले सर्वोच्च न्यायालयाचे वकील सुरेन उप्पल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १ जून रोजी २९ पानी पत्र पाठवून ही तक्रार करत अनेक महत्वपूर्ण बाबींचा उल्लेख केल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे.
उप्पल यांनी दोन महिन्यांपूर्वी एस्सार समूहाचे उच्चपदस्थ अधिकारी आणि इतर संबंधित कंपन्या यांना त्यांचे अशील व एस्सारचे माजी कर्मचारी अलबसित खान यांच्यावतीने एक नोटीस पाठवली होती, ज्यामध्ये टॅपिंग मोहिमेवर देखरेख ठेवल्याचा दावा खान यांनी केला होता. व्यवस्थापनाच्या निर्देशांवरून दूरध्वनींमध्ये हस्तक्षेप करून त्यावरील संभाषण रेकॉर्ड करण्यात आले, त्या वेळी खान हे एस्सारमध्ये सुरक्षा व्यवस्थेचे प्रमुख होते, असे उप्पल यांनी सांगितले आहे. फोन टॅपिंगची ही कारवाई दिल्ली व मुंबईतील एका कार्यालयातून करण्यात आली होती, असे उप्पल यांनी पंतप्रधानांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, माजी मंत्री प्रफुल्ल पटेल व राम नाईक, मुकेश अंबानी, अनिल अंबानी, त्यांची पत्नी टीना अंबानी, तसेच अनिल अंबानींच्या कंपनीतील अनेक उच्चपदस्थ अधिकारी, खासदार अमरसिंह व माजी मंत्री प्रमोद महाजन, यांचे फोन कथितरित्या टॅप करण्यात आल्याचे म्हटले आहे. कोणाकोणाल हे कॉल्स केले गेले, त्याची तारीख, वेळ व त्यात झालेली महत्वपूर्ण संभाषणे आदी सर्व बाबींची नोंद केलेल्या डायऱ्या उप्पल यांच्याजवळ आहेत, असे समजते.