नवी दिल्लीः एक काळ असा होता, जेव्हा देशात सतत राजकारण होत होतं. पण आता दिवस बदललेत. तुम्ही सत्तेत असा किंवा विरोधी पक्षांत; जनतेसाठी तुम्ही काय काम करता हे महत्त्वाचं झालंय. आता फक्त मोर्चे काढून जनतेचा पाठिंबा मिळत नाही, 'आम आदमी'च्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्यांनाच ते साथ देतात, अशा शब्दांत अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील आमदार-खासदारांना मार्गदर्शन केलं. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रीय लोकप्रतिनिधी संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. त्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केलं.
देशातील ११५ मागास जिल्ह्यांचा विकास झाला, तर देशाचा विकास आपोआपच होणार आहे. त्यासाठी या जिल्ह्यांमध्ये तरुण अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, त्यांच्यातील उत्साह - ऊर्जा - जिद्द आणि धडाडीमुळे चित्र लवकर पालटू शकेल, अशी सूचनाही त्यांनी राज्य सरकारांना केली.
केंद्र सरकार किंवा राज्य सरकार जेव्हा एखादं लक्ष्य ठरवतं, तेव्हा झटपट प्रगती करणाऱ्यांना प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे जे पुढारलेले आहेत, ते आणखी वेगाने पुढे जातात आणि मागे राहिलेले मागेच राहतात. या गोष्टीचा आपण विचार करायला हवा, असं पंतप्रधानांनी निदर्शनास आणलं. बऱ्याचदा जास्त वयाच्या व्यक्तीला मागास जिल्ह्यांमध्ये नियुक्त केलं जातं. अनेकदा, आपल्याला इथे कुठे पाठवलंय, असाच विचार होतो. ही मानसिकता बदलायला हवी, असंही त्यांनी सूचित केलं.