- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अत्यावश्यक औषधांच्या दरात २.२९ टक्के वाढ होणार आहे. सरकारने अत्यावश्यक औषधांवर १२ टक्के कर निश्चित केला आहे. सध्या हा दर फक्त ९ टक्के आहे. जीएसटीमुळे इन्शुलिनसारख्या काही औषधांच्या किंमती कमी होऊ शकतात. सरकारने त्यांच्यावरील कर १२ टक्क्यांवरुन ५ टक्के म्हणजे ७ टक्क्यांनी कमी केला. अत्यावश्यक औषधींमध्ये हेपरिन, वॉरफेरिन, डिल्टियाजम, डायजेपाम, इबुप्रोफेन, प्रोप्रनोलॉल आणि इमातिनिब यांचा समावेश आहे. ड्रग्ज प्राइज रेग्यूलेटरने स्पष्ट केले आहे की, काही औषधांवर एमआरपीवर अबकारी कर आकारला जातो. त्यामुळे या औषधांची विक्री किंमत वेगळी असू शकेल. जीएसटीतील कर वाढीमुळे औषध विक्री कंपन्यांसमोर दरवाढीशिवाय पर्याय राहणार नाही, असे स्पष्ट झाले आहे. तथापि, नवी पद्धत स्वीकारण्यात फार्मा उद्योगाला कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.जीएसटी १ जुलैपासूनच जीएसटी १ जुलैपासूनच लागू होणार असल्याचे सरकारने मंगळवारी स्पष्ट केले. १ जुलैचा मुहूर्त चुकणार असल्याचे वृत्त सरकारने फेटाळले आहे. उद्योगक्षेत्रातील एक गट तूर्तास अंमलबजावणी टाळण्याचा प्रयत्न करत आहे. पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमीत मित्रा यांनी जीएसटी एक महिन्यासाठी टाळण्याची मागणी केली होती. महसूल सचिव हसमुख अधिया यांनी सांगितले की, जीएसटीला वेळ लागणार असल्याच्या अफवा खोट्या आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने १२०० वस्तू आणि ५०० सेवा यांच्या कराचे दर निश्चित केले आहेत. या वस्तू आणि सेवांना ५,१२,१८ आणि २८ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये ठेवले आहे.