ऑनलाइन लोकमत/सुरेश भटेवरानवी दिल्ली, दि. 8 - भारतात लुप्त होत चाललेल्या कला आणि हस्तकौशल्यातील कारागिरीचे जतन करण्याचा विडा नानाजी देशमुख श्रद्धा केंद्राने उचलला आहे. जनसंघापासून भाजपचे दिवंगत नेते आणि खासदार, रा. स्व. संघाचे अग्रणी प्रचारक नानाजी देशमुख यांच्या नावाने रा. स्व. संघाशी संबंधित दीनदयाल रिसर्च इन्स्टिटयुट (डीआरआय) संस्थेने नानाजी देशमुख श्रद्धा केंद्राची उभारणी केली आहे.नानाजी देशमुखांचा जन्म महाराष्ट्रातल्या हिंगोली जिल्ह्यात 1916 साली कडोली गावात झाला. नानाजींच्या कडोली या जन्मगावी जून महिन्यापासून 10 एकराच्या विस्तीर्ण परिसरात श्रध्दा केंद्राचे काम सुरू होईल. या उपक्रमासाठी केंद्र तसेच राज्य सरकारची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती देताना दीनदयाल रिसर्च इन्स्टिटयुटचे महासचिव अतुल जैन म्हणाले, या उपक्रमाचे नामकरण जरी श्रद्धा केंद्र असले तरी कोणत्याही मंदिराची उभारणी त्याव्दारे होणार नसून लुप्त होत चाललेल्या प्राचीन कला आणि हस्तकौशल्यातील कारागिरीला जतन करण्यासाठी एका कर्मभूमीची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. या कर्मभूमीत भारतीय संस्कृतीतील चांगले संस्कार जनतेला शिकवले जातील. कडोलीचे श्रध्दा केंद्र देशात सर्वात मोठे केंद्र असेल. याखेरीज उत्तरप्रदेशात चित्रकूट येथे आणखी 8 केंद्रे, तसेच युपीत गोंडा आणि महाराष्ट्रात बीड येथे आणखी प्रत्येकी एक केंद्र उभारले जाणार आहे. या सर्व 11 केंद्रांचे काम देखील पुढील महिन्यातच सुरू होऊ शकेल, असेही जैन म्हणाले.
हस्तकौशल्यातील कारागिरीचे जतन करण्यासाठी नानाजी देशमुख श्रद्धा केंद्राची स्थापना
By admin | Published: May 08, 2017 8:43 PM