ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - देशात नुकत्याच 5 राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस भुईसपाट झाल्याचं पाहायला मिळालं. याची पुनरावृत्ती 2018मध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत होऊ नये, यासाठी काँग्रेस पक्ष आतापासून कामाला लागला आहे.
2018मध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे होणा-या विधानसभा निवडणुकीत भाजपाला काँटे की टक्कर देण्यासाठी काँग्रेस "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" प्रमाणे ‘राष्ट्रीय काँग्रेस स्वयंसेवक संघ’ स्थापन करणार आहे, अशी घोषणा काँग्रेसचे वरिष्ठ नेते असलम शेर खान यांनी बुधवारी केली.
असलम असे म्हणाले की, ‘राष्ट्रीय काँग्रेस स्वयंसेवक संघ’ची स्थापना करण्याची मी घोषणा केली आहे. ही संघटना मध्य प्रदेश तसंच छत्तीसगडमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी त्याचप्रमाणे मदत करेल, ज्याप्रमाणे आरएसएस लपूनछपून मागील दरवाजाने भाजपाची मदत करत आली आहे.
काँग्रेस ‘राष्ट्रीय काँग्रेस स्वयंसेवक संघ’स्थापन करणार म्हणून ड्रेस कोड कसा असेल याची उत्सुकता होती. पण या संघाचा आरएसएसप्रमाणे कोणताही ड्रेस कोड नसणार, असे असलम यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र दुसरीकडे, आरसीएसएसची रचना आरएसएसप्रमाणेच असले, असेही त्यांनी सांगितले.
तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांची संख्या कमी आहे. एखाद्या राजकीय पक्षाला निवडणूक जिंकण्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तेथे पक्षाचे कार्यकर्ते असणं गरजेचं आहे. या उद्देशाने ‘राष्ट्रीय काँग्रेस स्वयंसेवक संघ’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला, असे असलम यांनी सांगितले.
राष्ट्रीय काँग्रेस स्वयंसेवक संघात अशा स्वयंसेवकांचा समावेश करण्यात येईल जे कोणत्याही अन्य राजकीय पक्षासोबत जोडलेले नसतील व त्यांचे विचार काँग्रेसच्या विचारसणीशी मिळतेजुळते असतील. असे स्पष्ट करतानाच, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरुन हे स्पष्ट झालं आहे की केवळ अल्पसंख्यांक मतांच्या जोरावर सत्तेत येणं अशक्य आहे, असेही मत असलम यांनी यावेळी मांडलं.
वर्षभरात 1 लाख स्वयंसेवकांचं लक्ष्य
दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी आरएसएसचं भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम करत आहेत. हेडगेवार यांनी चार जणांसोबत मिळून संघाची स्थापना केली होती व ते देखील भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याचं काम करत होते, असा आरोप असलम यांनी केला आहे. दरम्यान, पुढील वर्षापर्यंत राष्ट्रीय काँग्रेस स्वयंसेवक संघात एक लाख स्वयंसेवक असतील. याद्वारे येणा-या दिवसात भाजपाला आगामी निवडणुकात टक्कर देण्यात येईल, असा दावाही असलम यांनी केला आहे.