ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - २०१६-१७ या आर्थिक वर्षात दूरसंचार क्षेत्रातून ९८,९९४.९३ कोटीचा महसूल गोळा होईल असा सरकारचा अंदाज आहे. यात स्पेक्ट्रम लिलावातून येणारी अंदाजित रक्कम आणि दूरसंचार खात्याकडून आकारण्यात येणा-या अन्य शुल्कातून जमा होणा-या रक्कमेचा समावेश आहे.
चालू आर्थिक वर्षात दूरसंचार क्षेत्रातून ५६,०३४.३५ कोटी रुपये जमा होईल असा अंदाज आहे. आधी ४२,८६५.६२ कोटी रक्कमेचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पुढच्यावर्षीसाठी जी अंदाजित ९८,९९४.९३ कोटीची रक्कम आहे त्यामध्ये चालू वर्षातील बाकी रहणा-या थकबाकीचाही समावेश करण्यात आला आहे.
जून-जुलैमध्ये स्पेक्ट्रमचा लिलाव होण्याची शक्यता आहे. सेव्हन बँण्डमधील स्पेक्ट्रम लिलावसाठी ट्रायने आधारभूत किंमत प्रस्तावित केली आहे. ५.३६ लाख कोटी या लिलावातून मिळतील असा अंदाज आहे. मार्च २०१५ मध्ये झालेल्या स्पेक्ट्रम लिलावातून केंद्र सरकारला १.१० लाख कोटी रुपये मिळाले होते.