इटावा: उत्तर प्रदेशच्या इटाव्यात कोरोना लसीकरण मोहिमेतील मोठा घोटाळा समोर आला आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या नावानं लसीकरण प्रमाणपत्रं जारी करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. इतकंच नव्हे, तर संडे सिंह-मंडे सिंह नावाच्या व्यक्तींनादेखील बोगस लस देण्यात आली आहे. हा प्रकार समोर येताच आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली.
इटाव्यात गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, पियूष गोयल यांच्या नावानं लसीकरणाची बोगस प्रमाणपत्रं जारी करण्यात आली आहेत. इटाव्याचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. भगवान सिंह यांनी घोटाळ्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. लसीकरणात झालेला घोटाळा उघडकीस येताच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
सीएचसी प्रभारी डॉ. उदय प्रताप सिंह यांच्या आयडीवरून १२ डिसेंबरला मंत्र्यांची लसीकरण प्रमाणपत्रं जारी झाली. हे प्रकरण समोर येताच सीएचसीपासून सीएमओपर्यंत खळबळ उडाली. १२ डिसेंबरला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, गृहमंत्री अमित शाह, उर्जा मंत्री पियूष गोयल, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पहिला डोस घेतल्याची प्रमाणपत्रं सीएचसी यांच्या आयडीवरून जारी झाली. इतकंच नव्हे, तर या सगळ्या मंत्र्यांना दुसऱ्या डोससाठी ६ मार्चची तारीख देण्यात आली.
आपल्या आयडीवरून मंत्र्यांच्या नावाची प्रमाणपत्रं जारी झाल्याचं समजताच सीएचसी प्रभारी डॉ. उदय प्रताप सिंह यांना धक्काच बसला. १२ डिसेंबर रविवारी आपला आईडी आणि पासवर्ड कोणीतरी हॅक केला होता, असं सिंह यांनी सांगितलं. 'या आयडीवरून लसीकरण होत नाही. लसीकरणासाठी दररोज नवीन आयडी तयार करण्यात येतात,' अशी माहिती त्यांनी दिली.