अहमदाबाद- कढाई चिकन 1 रुपयात व बटर नान 6 रुपयांमध्ये. तुम्ही एकदम बरोबर वाचत आहात. अहमदाबादचा रहिवासी असणारा 22 वर्षीय कनिष्क सजनानी याने आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून मुंबई यात्रेच्या दरम्यान याच किंमतीमध्ये जेवण ऑर्डर केलं. यामध्ये सगळ्यात हैराण करणारी गोष्ट म्हणजे तांत्रिक बिघाडाची माहिती देऊनही अधिकाऱ्यांनी सात महिने हा बिघाड दुरूस्त केला नाही. अहमदाबाद मिररने हे वृत्त दिलं आहे.
कनिष्क हा एक एथिकल हॅकर आहे. आयआरसीटीच्या वेबसाइटवर फुकटात जेवण ऑर्डर करू शकत असल्याची माहिती कनिष्कला गेल्यावर्षी जून महिन्यात मिळाली होती. त्यानंतर त्याने लगेचच आयआरसीटीसीच्या चेअरमनला याबद्दल सांगितलं. तसंच त्याने 25 जून रोजी माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनाही ईमेल करत याबद्दल सांगितलं होतं. पण कनिष्कला दोघांकडून काही उत्तर न मिळाल्याने त्याने पुरावे जमवायला सुरूवात केली. 22 जून 2017 रोजी त्याने सिस्टम हॅक करून अहमदाबादहून मुंबईच्या प्रवासासाठी कढाई चिकन व बटर नान ऑर्डर केलं. कनिष्कने सांगितलं की, 163 रूपयांच्या कढाई चिकनसाठी मी 1.03 रुपये मोबिक्विक वॉलेटमधून भरले. आणि 68 रुपयांच्या बटर नानसाठी 6 रुपये पेटीएमच्या माध्यमातून दिले. आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करावी, यासाठी आत्तापर्यंत ही गोष्ट समोर आणली नाही, असंही कनिष्कने म्हंटलं. कनिष्कने आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांना इतर दोन बेवसाइटबद्दलही सांगितलं.
आयआरसीटीच्या वेबसाइटवरील बिघाड 3 फेब्रुवारी 2018 रोजी दुरुस्त झाला. फुकटात ऑर्डर केलेलं जेवण कनिष्कने मुंबई सेंट्रल स्टेशनवर असणाऱ्या काही बेघर लोकांना वाटलं. कनिष्क हा याआधी 2016 साली एअर इंडियाची वेबसाइठ हॅक केल्याने चर्चेत आला होता. याशिवाय त्याने एक प्रायव्हेट एअरलाइन, ट्रॅव्हल पोर्टल, ऑनलाइन फूड सव्हिस आणि एका मोबाइल वॉलेट कंपनीला ऑनलाइन ऑपरेशनच्या तांत्रिक उणिवा समोर आणल्या होत्या.