नवी दिल्ली : वैमानिक आणि विमानातील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी अरेरावीपणा करीत गैरवर्तन केल्याच्या दोन घटनांमुळे विमान सेवा कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लागले आहे. यातील एक प्रकार अत्यंत भयंकर आणि संतापजनक आहे. जेट एअरवेजच्या विदेशी वैमानिकाने एका प्रवासी महिलेविरुद्ध वांशिक भेदभावजनक टिपणी करीत तिला मारहाणही केली. एवढेच नाही तर, त्याने एका दिव्यांग व्यक्तीविरुद्धही अपशब्द वापरले.चंदीगड-मुंबई हवाईमार्गावरील जेट एअरवेजच्या विमानात ६ एप्रिल रोजी घडलेला हा प्रकार क्रिकेटपटू हरभजनसिंग याच्या टिष्ट्वटने उजेडात आला. या घटनेबद्दल जेट एअरवेजने खेद व्यक्त केला आहे. संबंधितावर कंपनीच्या धोरणानुसार चौकशीअंती योग्य कारवाई केली जाईल, अशी ग्वाही जेट एअरवेजने दिली आहे. ही घटना घडल्यापासून या विदेशी वैमानिकाचे नाव कर्मचाऱ्यांच्या कार्ययादीतून वगळण्यात आले आहे.हरभजनने केलेल्या टिष्ट्वटमध्ये असे स्पष्ट केले आहे की, मी या विमानात नव्हतो. एका ओळखीच्या व्यक्तीकडून ही घटना समजली. ‘आम्ही अभिमानी भारतीय आहोत. निंदनीय नव्हे. माफी नको. त्या वैमानिकाला भारतातून हाकला. जेणेकरून भारतीयांना असे म्हणण्याचे कोणीही धाडस करणार नाही.’ हरभजनने या घटनेचा निषेध करून हा प्रकार लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे.जेट एअरवेजचा वैमानिक बर्ण्ड होएस्सिली हा भारतात कमाई करतो अन् आम्हा भारतीयांंचा तिरस्कार करतो. त्याने वांशिकभेदभावजनक टिपणी तर केलीच शिवाय त्या महिलेला मारहाण केली. एवढेच नाही तर एका दिव्यांग व्यक्तीबाबत अपशब्द काढले, असे टिष्ट्वटवर म्हणत हरभजनने त्या विदेशी वैमानिकाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली.जेट एअरवेजच्या स्थानिक वैमानिकांच्या संघटनेने वैमानिकांच्या वर्तनाबाबत चिंता अलीकडेच चिंता व्यक्त केलेली असताना हरभजनने टिष्ट्वट करून या वैमानिकाच्या गैरवर्तनाचा प्रकार उघडकीस आणला आहे.
विदेशी वैमानिकाची वांशिक शेरेबाजी
By admin | Published: April 27, 2017 1:34 AM