ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 17 - एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात ""स्वच्छ भारत अभियान"" यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक घरामध्ये शौचालय बांधण्यात यावे, असे आवाहन या अभियाना अंतर्गत देशवासियांना करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मध्य प्रदेशातील एका ठिकाणी शौचालयावरुन जातीय संघर्ष सुरू झाला आहे. बुंदेलखंडमधील एका गावात अनुसूचित प्रवर्गात मोडणा-या लोकांनी असा आरोप केला आहे की, काही बड्या लोकांनी त्यांच्या शौचालयांची मोडतोड केली आहे.
""नवभारत टाइम्स""नं दिलेल्या वृत्तानुसार छतरपूर जिल्ह्यापासून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर बराखेरा गावातील दलित व पटेल यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दलित समाजातील महिलांनी पटेलांवर असा आरोप केला आहे की, त्यांच्यातील काही जणांनी यासाठी आमच्या शौचालयांची मोडतोड केली कारण शौचालयाचे दरवाजे त्यांच्या घरासमोर आहेत. शौचास जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे मात्र यावरही बंदी घालण्यात येत असल्याचे दलितांचे म्हणणे आहे.
गावातील परिस्थितीबाबत दलित समाजातील लोकांचे असे म्हणणे आहे की, ""पटेल समाजातील लोकं शौचास बाहेर जाण्यासंबंधीही आम्हाला मारहाण करण्याची धमकी देतात. ते आम्हाला शौचालयदेखील वापरू देत नाहीत आणि उघड्यावर जाण्यासही मज्जाव करत आहेत"".
आणखी बातम्या वाचा
या तणावाबाबत प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर शनिवारी अधिका-यांचं पथक गावात पोहोचलं जेणेकरुन चौकशी करुन पुन्हा शौचालयाची बांधणी केली जाईल. या गावात प्रजापती समाजातील अर्धा डझनहून कुटुंब आहेत. पटेल समाज हा वरील मागासवर्गीयांमध्ये मोडतो, मात्र परिसरातील समृद्ध व राजकीयदृष्ट्या प्रभावी असा हा समाज आहे.
स्थानिक मुकेश प्रजापती यांनी सांगितले की, आम्ही लोकं शौचासाठी आता घराच्या मागील बाजूस मातीच्या भांड्यांचा वापर करत आहोत. गावातील सरपंचही पटेल समाजातील आहे. आमची शौचालयं केवळ यासाठी तोडण्यात आली कारण त्यांचे दरवाजे पटेल समाजातील घरांसमोर आहेत.
तर जिल्हा पंचायत समितीचे सीईओ हर्ष दीक्षित यांनी सांगितले की, प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक पथक तेथे पाठवण्यात आले आहे. शौचालयं का तोडण्यात आली, याचा तपास हे पथक करेल. पथकाचा अहवाल आल्यानंतरच यासंदर्भात प्रतिक्रिया देणं योग्य ठरेल.