नवी दिल्ली: युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीबद्दल चर्चा झाली. युरोपियन युनियनचं शिष्टमंडळ उद्या जम्मू-काश्मीरचा दौरा करेल. 5 ऑगस्टला जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्यात आलं. त्यानंतर पहिल्यांदाच परदेशी शिष्टमंडळ या भागाला भेट देणार आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 काढल्यानंतर जगभरात हा विषय चर्चेत आला. पाकिस्ताननं अनेकदा जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या परिषदांमध्ये जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. मात्र सगळ्याच व्यासपीठांवर पाकिस्तानला अपयश आलं. यानंतर आता युरोपियन युनियनचं शिष्टमंडळ जम्मू काश्मीरला भेट देणार आहे. या शिष्टमंडळात 28 सदस्यांचा समावेश आहे. आतापर्यंत भारतानं कोणत्याही परदेशी शिष्टमंडळाला जम्मू काश्मीरमध्ये जाण्याची परवानगी दिली नव्हती. त्यामुळेच युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळाचा जम्मू काश्मीर दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळानं मोदींची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं. जम्मू-काश्मीरसह देशाच्या अनेक भागांचा शिष्टमंडळाकडून केला जाणारा दौरा यशस्वी होईल, असा विश्वास पंतप्रधान कार्यालयानं व्यक्त केला आहे. भारताच्या दौऱ्यादरम्यान शिष्टमंडळाला सांस्कृतिक विविधता आणि विकास कामंदेखील पाहता येतील, असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. एका सामाजिक संस्थेनं युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळाची जम्मू काश्मीरचा दौरा आयोजित केला आहे. शिष्टमंडळातले बहुतांश सदस्य इटालियन आहेत.