लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी पुढील वर्षी राज्यात लोकसभेची निवडणूक होणार असून, त्यातील कामगिरीवर भाजपच्या आमदारांचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल, असे म्हटले जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मंगळवारी मुंबईत याबाबतचे संकेत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह विद्यमान सर्व आमदारांची तिकिटे कापली जाणार असल्याचे वृत्त असतानाच नड्डा यांनी मंगळवारच्या मुंबई भेटीत निवडक नेत्यांची बैठक घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर अर्धा तास झालेल्या बैठकीला फडणवीस यांच्यासह राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीतील यशावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. आमदारांना लोकसभा निवडणुकीसाठी उत्तरदायी करण्याची पद्धत तयार करा आणि त्यानुसार जबाबदाऱ्यांचे वाटप करा, असे निर्देश नड्डा यांनी बैठकीत दिल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
गणेश दर्शननड्डा यांनी फडणवीस यांच्याकडील श्री गणरायाचे दर्शन घेतले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊनही श्री गणरायाचे दर्शन घेतले. सागर बंगल्यावरील निवडक नेत्यांच्या बैठकीनंतर त्यांनी मुंबईतील भाजप आमदारांसोबत सहभोजन घेतले.