नवी दिल्ली - तरुणीची छेड काढणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये भररस्त्यात महिलांची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंना कोणाचाच धाक नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रायपूरमधील अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर तर ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरिखित झाली. मात्र आता यावर तातडीने कारवाई करण्यात आल्याची एक घटना समोर आली आहे. पोलिसांनी तरुणीची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंना चांगलीच अद्दल घडवली आहे. रायपूर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
सोशल मीडियावर शुक्रवारी रायपूरच्या एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये स्कुटरवर बसलेले दोन तरुण रस्त्यावरून जाणाऱ्या एक तरुणीला वारंवार रोखण्याचा प्रयत्न करताना दिसले. तरुणीने दुर्लक्ष करून त्यांना टाळण्याचा प्रयत्नही केला मात्र यामुळे या तरुणांची हिंमत आणखी जास्त वाढली. दिवसाढवळ्या भररस्त्यात तरुणीची छेडछाड करताना त्यांना कुणाचाही धाक नसलेला दिसून आला. धक्कादायक म्हणजे ही घटना छत्तीसगडचे विधानसभा अध्यक्ष चरणदास महंत यांच्या निवासस्थानासमोरच्या रस्त्यावर घडल्याचं सांगण्यात येत आहे.
एका व्यक्तीने ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली होती. त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत रायपूर पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. तसेच अनेक नागरिकांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर रायपूर पोलिसांनी कारवाई केली आहे. दोन आरोपींना अटक केली असून त्यांची स्कूटरही जप्त केली. कायद्यानुसार दोन्ही आरोपींविरोधात कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.