गेल्या १२ वर्षांपासून दिल्लीत सत्तेवर असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला आहे. तर भाजपला मोठा विजय मिळाला आहे. मात्र याच वेळी, काँग्रेसला मात्र आपले खातेही उघडता आलेले नाही. याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील I.N.D.I.A. सोबत निवडणूक लढणाऱ्या आपने दिल्लीतही आघाडी करून निवडणूक लढली असती, तर निकाल काही वेगळे आला असता, असे काही राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासंदर्भात आता काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांनी मोठे विधान केले आहे.
काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले, दिल्लीतील जनतेने कुणालाही हरवले नाही. तर केजरीवाल यांना पदावरून दूर केले आहे. AAP-काँग्रेस आघाडीसंदर्भात बोलताना ते म्हणाले, दिल्लीत 10 पक्ष जरी त्यांच्यासोबत असते, तरीही त्यांचा पराभव निश्चित होता. कारण दिल्लीने अरविंद केजरीवाल यांना सत्तेवरून हटवण्याचा निर्णय आधीच घेतलेला होता.
काय म्हणाले संदीप दीक्षित? -काँग्रेस नेते दिक्षित म्हणाले, "दिल्लीतील जनतेने कुणालाही हरवलेले नाही. उलट त्यांनी अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवले आहे. जर आम्ही (आप आणि काँग्रेस) एकत्रितपणे निवडणूक लढवली असती, तर निकाल आणखी वाईट आले असते. दिल्लीतील जनतेने अरविंद केजरीवाल यांना हटवण्याचे निश्चित केले होते. त्यांच्या सोबत १० पक्ष असते तरीही ते हरलेच असते.
48 जागांवर भाजपचा विजय -दिल्लीतील ७० विधानसभा जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले आणि ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत, भारतीय जनता पक्षाने ४८ जागा जिंकत प्रचंड विजय मिळवला. आम आदमी पक्षाला २२ जागा मिळाल्या, तर काँग्रेससह इतर पक्षांना खातेही उघडता आले नाही.