मुंबई - गेल्या काही काळात देशातील विविध भागाच झालेल्या मॉब लिंचिंगच्या प्रकारामुळे देशात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या 14 हजार कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी आणि गीतांजली जेम्सचा प्रमोटर मेहूल चौकसी यानेही भारतातील कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी मॉब लिंचिंगचा आधार घेतला आहे. भारतात आल्यास आपल्याचा मॉब लिंचिंगचा सामना करावा लागेल अशी भीती व्यक्त करत त्याने आपल्याविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची मागणी केली आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत पीएमएलए कोर्टाने मार्च आणि जुलै महिन्यात मेहुल चौकसीविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. पीएनबी घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच चौकसी हा देश सोडून पसार झाला होता. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला त्याचा भाचा नीरव मोदी हासुद्धा फरार आहे. विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आपल्या याचिकेत मेहूल चौकसीने माजी कर्मचारी, कर्जदाते आणि तुरुंगातील कर्मचारी आणि कैद्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली. आपल्याला कंपनी चालवणे अशक्य झाले आहे. कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन आणि कर्जदात्यांना त्यांची रक्कम परत मिळालेली नाही. त्यामुळे या सर्वांचा आपल्यावर राग आहे. तसेच त्यामुळे आपल्या जीवाला धोका उत्पन्न झाला आहे, असे चौकसीने आपल्या याचिकेत म्हटले आहे. हल्लीच्या दिवसात भारतात मॉब लिंचिंगच्या घटना वाढल्या आहेत. सर्वसामान्य जनता रस्त्यावरच प्रकरणांचा सोक्षमोक्ष लावत आहे. अशा परिस्थितील आपल्याबरोबरही असा प्रकार घडू शकतो. असा दावा चौकसीने आपल्या याचिकेत केला आहे.
पीएनबी घोटाळ्यातील आरोपीलाही वाटतेय मॉब लिंचिंगची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 6:39 PM