नवी दिल्ली: भारताचे दोन वैमानिक ताब्यात असल्याचा दावा पाकिस्ताननं दुपारच्या सुमारास केला होता. यानंतर आता पाकिस्ताननं केवळ एकच वैमानिक आपल्या ताब्यात असल्याचं म्हटलं आहे. अभिनंदन वर्धमान असं पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या वैमानिकाचं नाव आहे. ते हवाई दलात विंग कमांडर आहेत. आज सकाळी मिग 21 विमानातून त्यांनी उड्डाण केलं. मात्र त्यांचं विमान कोसळलं आणि पाकिस्तानी सैन्यानं त्यांना ताब्यात घेतलं. भारतीय वैमानिक पाकिस्तानच्या हाती लागल्याचं वृत्त पसरताच देशभरातून चिंता व्यक्त होऊ लागली. थोड्याच वेळात ताब्यात असलेल्या वैमानिकाचं नाव अभिनंदन असल्याची माहिती समोर येऊ लागली. त्यानंतर त्यांचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. यामध्ये पाकिस्तानकडून अभिनंदन यांना अमानुषपणे मारहाण होत असल्याचं दिसत होतं. यानंतर भारतानं पाकिस्तानकडे अभिनंदन यांच्या सुटकेची मागणी केली. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. सीमावर्ती भागात दोन्ही देशांच्या कारवाई सुरू आहेत. त्यामुळे अभिनंदन यांना ताब्यात घेताच पाकिस्ताननं त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांच्याकडून भारताच्या पुढील योजना, रणनिती याबद्दलची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र मारहाण होऊनही अभिनंदन यांनी कोणतीही गोपनीय माहिती पाकिस्तानला दिली नाही. 'माझं नाव विंग कमांडर अभिनंदन आहे. माझा सर्व्हिस नंबर 27981 आहे. मी फ्लाईंग पायलट असून हिंदू आहे,' इतकीच जुजबी माहिती त्यांनी दिली. या व्हिडीओत अभिनंदन यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली दिसत आहे.अभिनंदन यांच्या मारहाणीचा व्हिडीओ समोर येताच भारतानं पाकिस्तानला संपर्क केला आणि त्यांच्या सुखरुप सुटकेची मागणी केली. युद्धकैदीला मारहाण करुन पाकिस्तान जिनिव्हा कराराचा भंग करत असल्याचा आरोप भारतानं केला. यानंतर पाकिस्ताननं अभिनंदन यांचा नवा व्हिडीओ प्रसिद्ध केला. यामध्ये अभिनंदन चहा पित असताना दिसत आहेत. 'माझ्यासोबत काहीच चुकीचं घडत नाही आणि भारतात आल्यावरही मी याच विधानावर कायम असेन,' असं या व्हिडीओमध्ये अभिनंदन यांनी म्हटलं आहे.
वाह रे वीर जवाना; पाकिस्तानी सैन्यानं मारलं-छळलं, तरीही अभिनंदन यांनी गुप्ततेचं वचन पाळलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 8:26 PM