पराभवानंतरही राहुल गांधी गुजरात-हिमाचलच्या दौ-यावर जाणार, सोमनाथ मंदिराचे घेणार दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 05:26 PM2017-12-19T17:26:44+5:302017-12-19T18:31:31+5:30
पराभवानंतरही या आठवड्यातच राहुल गांधी गुजरात आणि हिमाचल प्रदेशचा दौरा करणार असल्याचे सांगण्यात येते. या निवडणुकीत कॉंग्रेस आणि मित्र पक्षांनी मिळून भाजपाला चांगलीच टक्कर दिली. त्यामुळे राहुल गांधी दोन्ही राज्यातील जनतेला आणि मित्र पक्षांना धन्यवाद देणार आहेत. याचबरोबर, राहुल गांधी गुजरातमधील सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तविण्यात येत आहे.
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला असला तर या निवडणुकीत कॉंग्रेसने भाजपाला कडवी टक्कर दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गुजरात हे राज्य राखण्यात भाजपाला कसेबसे यश मिळाले असून, हिमाचल प्रदेश मात्र काँग्रेसने आपल्या हातातून गमावले. नरेंद्र मोदींनी गुजरात जिंकले पण, काठावरचे बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच बाजीगर ठरले आहेत. गुजरातमध्ये भाजपाला 182 पैकी जेमतेम 99 जागा तर काँग्रेसने ८0 जागांवर यश मिळविले आहे. तिथे बहुमतासाठी 92 जागांची गरज होती. दरम्यान, पराभवानंतरही या आठवड्यातच राहुल गांधी गुजरात आणि हिमाचल प्रदेशचा दौरा करणार असल्याचे सांगण्यात येते.
या निवडणुकीत कॉंग्रेस आणि मित्र पक्षांनी मिळून भाजपाला चांगलीच टक्कर दिली. त्यामुळे राहुल गांधी दोन्ही राज्यातील जनतेला आणि मित्र पक्षांना धन्यवाद देणार आहेत. याचबरोबर, राहुल गांधी गुजरातमधील सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तविण्यात येत आहे. सोमनाथमध्ये कॉंग्रेसने चार जागांवर विजय मिळविला आहे. तसेच, बुधवारपासून अहमदाबादमध्ये कॉंग्रेसची चिंतन बैठक आहे. या बैठकीत एक दिवसांसाठी राहुल गांधी हजर राहणार आहेत. ही चिंतन बैठक 20, 21 आणि 22 डिसेंबरला होणार आहे.
दरम्यान, मंगळवारी पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाना साधला. ते म्हणाले की, गुजरात निकालामुळे मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काँग्रेससाठी हा चांगला निकाल नसून गुजरातमध्ये भाजपाला जबरदस्त फटका बसला असल्याचा टोलाही राहुल गांधींनी लगावला. यावेळी त्यांनी विजयी झालेल्यांचे अभिनंदनही केले.
'आमच्यासाठी हा खूप चांगला निकाल आहे. ठीक आहे पराभव झाला, जिंकू शकत होतो. तिथे थोडी कमतरता राहिली', असे राहुल गांधी म्हणाले. 'तीन चार महिन्यांपूर्वी जेव्हा आम्ही गुजरातमध्ये गेलो तेव्हा काँग्रेस भाजपासोबत लढू शकत नाही असा दावा करण्यात आला होता. पण आम्ही मेहनत केली आणि निकाल तुमच्या समोर आहे. भाजपाला जबरदस्त फटका बसला आहे', असे राहुल गांधी म्हणाले.