ऑनलाइन लोकमत
तिरूअनंतपुरम, दि. ११ - केरळच्या कोल्लम शहरालगत परवूरच्या प्रसिद्ध पुत्तिंगल मंदिरात फटाक्यांमुळे आग लागून १००हून अधिक नागरिक ठार झाल्यानंतरही मंदिर प्रशासनाला अद्यापही जाग आली नसून मंदिरातील फटाक्यांच्या आतीषबाजीवर बंदी घालण्यास नकार देण्यात आला आहे. राज्यातील १,२५५ मंदिरांचा कारभार सांभाळणा-या त्रावणकोर देवास्वोम बोर्डाने हा निर्णय घेतला असून फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. वार्षिक उत्सवांदरम्यान मंदिरात फटाक्यांची आतीषबाजी करणं हा परंपरेचा एक भाग असल्याने देवस्थान मंडळ फटक्यांवर बंदी घालण्याच्य निर्णयाच्या विरोधात असल्याचे त्रावणकोर देवास्वोम बोर्डाचे अध्यक्ष प्रयार गोपालकृष्णन यांनी सांगितले. मात्र असे असले तरी सरकार व न्यायालयाने दिलेले आदेश व पुरेशी सुरक्षा व्यवस्थेची उपाययोजना करूनच ही आतिषबाजी करण्यात यावी असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान या आतीषबाजीच्या बंदीच्या मुद्यावरून बोर्डाच्या सदस्यांमध्येही मतभेद असल्याचे दिसून आले. 'फटाक्यांच्या आतीषबाजीवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी' या निर्णयाचे आपण समर्थन करतो असे मत बोर्डाचे अधिकारी अजय थरायिल यांनी नोंदवले.
दरम्यान त्रावणकोर देवास्वोम बोर्डातर्फे सर्व मंदिरांना तातडीने एक पत्रक पाठवण्यात आले असून सर्व अटी व नियमांचे पालन करूनच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात यावी असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
रविवारी पहाटे कोल्लममधील पुत्तिंगल मंदिरात फटाक्यांमुळे लागलेल्या भीषण आगीत 108 भाविकांचा होरपळून मृत्यू झाला तर २००हून अधिक भाविक जखमी झाले. नवरात्रोस्तवामुळे मंदिरात भाविकांची अलोट गर्दी जमली होती, त्यावेळी ही आग दुर्घटना घडली आणि अनेक भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान या अग्नीतांडवाप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. आतीषबाजीला जिल्हा प्रशासनाने अधिकृतरीत्या परवानगी दिली नव्हती; मात्र वार्षिक उत्सवाच्या वेळी परंपरेनुसार आतीषबाजी केली गेली.
पहाटे ३.३० वाजतादरम्यान आतशबाजी बघण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. मंदिराजवळील ‘कंबपुरा’ गोदामावर आगीची ठिणगी पडली आणि स्फोट होऊन एकाचवेळी भीषण कर्णभेदी आवाजांनी परिसर दणाणून गेला. स्फोट एवढा भीषण होता की, आवाज किमान १ किलोमीटरच्या परिसरात ऐकू आला. लगेच वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे परिसर अंधारात बुडाला असताना लोक जिवाच्या आकांताने पळू लागले. त्यातच चेंगराचेंगरी होऊन अनेक जण जखमी झाले.