नवी दिल्ली : अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांच्या उद्योगपती निखिल जैन यांच्याशी मोडलेल्या विवाहाची चर्चा गेले अनेक दिवस सुरु आहे. त्याबाबत नुसरत जहाँ यांनी खुलासे करीत एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतरही निखिल जैन यांनी आपल्या बँक खात्यातून पैसे काढल्याचा आरोप केला आहे. जारी केलेल्या निवेदनात त्यांनी निखिल जैनसोबत झालेला विवाह भारतीय कायद्यांच्या दृष्टीने अवैध असल्याचे म्हटले आहे.विवाहाबाबत त्या म्हणाल्या आहेत की, तुर्की कायद्यानुसार आमचा विवाह झाला होता. भारतातील कायद्यानुसार ते झाले नसल्याने ते फक्त लिव्ह-इन-रिलेशनशिप होते. त्यामुळे औपचारिक घटस्फोट घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही फार पूर्वीच वेगळे झालो आहोत. फक्त त्यावर भाष्य करण्याचे मी टाळले होते. त्यामुळे माझ्या कृतीवर कुणीही आक्षेप घेण्याचे कारण नाही.श्रीमंत असल्याचा दावा करणारे निखिल जैन यांनी आपल्या बँक खात्यातून अवैधरीत्या पैसे काढले आहेत. वेगळे झाल्यानंतर हा प्रकार सुरु राहिल्याने मी बँकेकडे याची तक्रार केली आहे. लवकर पोलिसात याची तक्रार देणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
दागिनेही ठेवून घेतल्याचा आरोपजारी केलेल्या निवेदनात त्यांनी अनेक बाबींवर खुलासा केला आहे. लग्नावेळी मला कुटुंबीयांनी दिलेले दागिने तसेच स्वकमाईतून मी घेतलेले दागिने, माझे कपडे, बॅगा आदी गोष्टी अजूनही निखिल यांनी त्यांच्याकडे ठेवून घेतल्या आहेत, असाही आरोप त्यांनी केला आहे.