नवी दिल्ली : शनिवारी रात्री दिल्ली स्टेशनवर शेकडो भाविक प्रयागराज रेल्वेची वाट पाहत उभे असताना गाडीचा फलाट बदलल्याच्या उद्घोषणेमुळे घात झाला आणि पळापळीत १८ जणांचे जीव गेले. फलाट बदलाचे कारण जीवघेणे ठरले आहे.
चेंगराचेंगरीच्या एका दिवसानंतर, हजारो प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला. योग्य नियोजन नसल्याने महाकुंभला जाणारे भाविक स्टेशनवर ताटकळत उभे होते. अतिरिक्त उपाय करूनही भाविकांचा ओघ सुरूच आहे. त्यापैकी बहुतेक महाकुंभ यात्रेकरू प्रयागराजला जात आहेत. जास्त गर्दीमुळे परिस्थिती हाताळणे अधिकाऱ्यांना कठीण झाले आहे.
फाटलेल्या बॅगांचे साक्षीदार
फलाट १४ आणि १५ एका भयंकर घटनेचे साक्षीदार ठरले. या फलाटांवर विखुरलेल्या चपला-बूट, फाटलेल्या बॅगा, खाण्याचे पदार्थ यांचा खच पाहणाऱ्यांचे मन हेलावून गेले होते. हे साहित्य रविवारी सकाळपर्यंत कर्मचाऱ्यांनी हलवले, परंतु या घटनेने प्रत्येकाच्या मनात कोरलेल्या भयंकर खुणा कधीच न मिटणाऱ्या ठरल्या.
पत्नी, मुलगी ठार, पण...
राजकुमार मांझीने त्याच्यावर कोसळलेल्या दु:खाची आपबीती सांगितली. राजकुमारची पत्नी आणि मुलगी या चेंगराचेंगरीत मारली गेली. मुलगा वाचला खरा, परंतु तो रविवारी उशिरापर्यंत सापडला नव्हता.
लोकांचा गेल्या २९ जानेवारीला मौनी अमावस्येदिवशी महाकुंभच्या संगम भागात चेंगराचेंगरीत मृत्यू, ६० जखमी. गेल्या वर्षी जुलैमध्ये उत्तर प्रदेशात हाथरसमध्ये स्वयंभू भोलेबाबांच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीतील घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
ताशी १५०० तिकिटे
एकिकडे विलंबाने धावणाऱ्या रेल्वे आणि दुसरीकडे सामान्य श्रेणीतील डब्यांसाठी ताशी १५०० तिकिटांची विक्री, यामुळे दिल्ली स्टेशनवर गर्दी वाढत राहिली. आता चुकले कुठे याचा अधिकारी शोध घेत आहेत.
इकडे राजकारण तापले
राहुल गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते : प्रयागराजकडे जाणाऱ्यांची संख्या पाहता योग्य नियोजन करायला हवे होते. या घटनेने पुन्हा एकदा रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता दिसून आली.
मल्लिकार्जून खरगे, काँग्रेस अध्यक्ष : चेंगराचेंगरीची घटना रेल्वे विभागाचे अपयश आणि सरकारच्या असंवेदनशीलतेची साक्ष आहे. सरकार सत्य दडवू पाहत आहे.
लालुप्रसाद यादव, राजद प्रमुख : दिल्ली स्टेशनवरील घटनेला सर्वस्वी रेल्वे विभागच जबाबदार आहे.
अखिलेश यादव, सपा प्रमुख : सुनियोजित व्यवस्थेच्या अभावामुळे अशा दुर्घटना होत आहेत.