केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी शनिवारी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून कोरोना परिस्थितीबाबत सतर्क केलं आहे. कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट ओसरत असताना अनलॉकची प्रक्रिया देशात सुरू झाल्यानं बाजारपेठा आणि इतर सेवा देखील पुन्हा पूर्ववत होत आहेत. पण असं असलं तरी कोरोनाला निमंत्रण देऊन असा कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा बाळगता कामा नये, असं सक्त सूचना गृह सचिवांनी लिहिलेल्या पत्रात राज्यांच्या सचिवांना देण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारनं जारी केलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन होईल याची जबाबदारी सुयोग्य पद्धतीनं पार पाडणं. यासोबतच चाचण्या, ट्रेसिंग आणि उपचार या सरकारच्या रणनितीवर भर देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्यानं स्थानिक पातळीवर राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी अनलॉक संदर्भातील निर्णय घेतले आहेत. पण निर्बंध पुन्हा लादावेत की नको याचा संपूर्णपणे निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून घ्यावा, असंही नमूद करण्यात आलं आहे.
कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याआधी संबंधित राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी संपूर्ण प्रक्रिया सतर्क राहूनच सुरू करावी. कोविड प्रोटकॉल अंतर्गत मास्कचं बंधन, हाताची स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग आणि बंद ठिकाणी सुयोग्य वेंटिलेशन असणं बंधनकारक आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात असताना या गोष्टींचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, काही राज्यांमध्ये निर्बंधांमध्ये सूट जाहीर होताच पुन्हा एकदा बाजरपेठा आणि इतर ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांबाबत लोक गांभीर्य बाळगत नसल्याचं दिसून आलं आहे.