- सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत आले असले तरी बँकांच्या एटीएम मशिन्समधे आजही नोटांचा खडखडाट आहे. अनेक एटीएम बंद आहेत. रोख व्यवहारांऐवजी प्लॅस्टिक करन्सी व डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढावे ही सरकारची इच्छा आहे. त्यामुळे रिझर्व बँकेकडूनच बँकांना नोटांचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे.एटीएममधील नोटांच्या तुटवड्याविषयी माजी अर्थमंत्री चिदंबरम म्हणतात की, नोटाबंदीनंतर आर्थिक व्यवहारातून सुमारे १५ लाख कोटींची रक्कम बाहेर जाणार आहे, याची सरकारला कल्पना होती. रोख रकमेची कमतरता तातडीने कशी कमी करता येईल? त्यासाठी छोट्या रकमेच्या नोटा अधिक प्रमाणात अगोदरच छापून तयार ठेवता येतील काय? याचे नियोजन केले नाही.परिणामी, नोटांची टंचाई कायम राहिली. नोटांची मागणी व रिझर्व बँकेकडून होणारा पुरवठा यांत अंतर पडले. बँकांकडेच नोटा नसतील तर एटीएममध्ये त्या कुठून येणार?डिजिटल व्यवहार वाढावेत यासाठी सरकारने एटीएम व त्यावरील भार कमी करण्याचे ठरवले असेल, तर व्यवहारांवर त्याचे काय दुष्परिणाम ओढवतील याचा विचार सरकारने केला आहे काय, ही शंका आहे.याचा त्रास सामान्यांना भोगावा लागेल. शिवाय अर्थकारणावरही त्याचा बराच नकारात्मक परिणाम संभवतो, असेही चिदम्बरम यांनी म्हटले आहे.नोटाबंदी झाल्यानंतर रोख चलन हाती नसल्याने लोकांना त्रास झाला. अनेक बँकांसमोर लांब रांगा लागल्या होत्या. पैसे काढण्यावरही बंधने होती.नव्या नोटा आल्यानंतरही अनेक रिकॅलिबरेशन न झाल्याने असंख्य एटीएम मशिन्स बंद होती. आता नोटांची छपाई झाली असतानाही एटीएममध्ये पैसे नाहीत, ही वस्तुस्थितीआहे.मुंबई व दिल्ली वगळता देशात असंख्य एटीएम बंद आहेत. एटीएममधून रोख काढण्याचे नियम जरी बदलले नसले तरी काही बँकांच्या एटीएममध्ये अन्य बँकांचे कार्ड चालत नाही. आपल्या ग्राहकांना प्राधान्याने रोख मिळावी, यासाठी काही बँकांनी आपल्या एटीएममध्ये दुस-या बँकांचे कार्ड स्वीकारणे बंद केले आहे.एटीएममध्ये नोटांच्या तुटवड्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बँकांकडे पुरेशा प्रमाणात नोटा नाहीत. रोज जितकी रोख लागते, त्याच्या २५ टक्के रक्कमही अनेकदा बँकांकडे नसते.दिल्ली-मुंबईतल्या ४ मोठ्या बँकांना १00 ते १२५ कोटींच्या नोटांची रोज गरज असते. मात्र छोट्या शहरांना पुरवठा व्हावा, यासाठी महानगरांच्या नोटांच्या पुरवठ्यात कपात झाली आहे. स्टेट बँकेसह अनेक बँकांनी अधिक रोख रक्कम उपलब्ध करून देण्याची मागणी लेखी स्वरूपात रिझर्व्ह बँकेकडे केली.तरीही स्टेट बँकेच्या ५१ टक्के एटीएममध्येच सध्या रोख रकमेचा पुरवठा सुरू आहे. केरळ, राजस्थानात फक्त ३0 टक्के एटीएममध्ये पैसे आहेत. आंध्र, तेलंगण, बिहार, गुजरातमधे रोख रकमेची सर्वाधिक टंचाई आहे, असे समजते.