नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काल केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा झाली होती. यामध्ये काशीमधील शिवानंद बाबा यांना मोदी सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. वाराणसीमधील कबीरनगर येथील राहणाऱ्या बाबा शिवानंद यांचे वय १२६ वर्षे आहे. तसेच ते पूर्णपणे स्वस्थ आहेत. त्यांचे आधारकार्ड आणि पासपोर्टवर त्यांच्या जन्माचे वय हे १८९६ नोंद आहे. त्या अर्थाने ते जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती आहेत. मात्र गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जपानच्या चित्तेसू वतनबे यांच्या नावावर सर्वात वयस्कर व्यक्तीचा रेकॉर्ड आहे.
शिवानंद बाबा केवळ उकडलेले भोजन घेतात. ते दररोज पहाजे ३ वाजता उठून योग करतात. त्यानंतर पूजा पाठ करून आपल्या दैनंदिन कामास सुरुवात करतात. तसेच ते कमी मीठ असलेले भोजन घेतात. त्यामुळेच १२६ वर्षे आपण तंदुरुस्त राहतो, असे ते सांगतात.
पद्म पुरस्कार मिळाल्याने ते खूप खूश आहेत. त्यांनी पद्मश्री पुरस्कार दिल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानले आहेत. शिवानंद बाबांनी सांगितले की, जीवनामध्ये सामान्य पद्धतीने जगले पाहिजे. शुद्ध आणि शाकाहारी भोजन केल्यामुळे मी पूर्णपणे स्वस्थ आणि निरोगी आहे. तर या बाबांचे वैद्य डॉ. एस.के. अग्रवाल यांनी सांगितले की, बाबा सात्विक भोजन करतात. तसेच पूर्णपणे शिस्तबद्ध जीवन जगतात. त्यांच्या जीवनामध्ये योग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तसेच बाबा भोजनामध्ये केवळ सेंधा मिठाचा वापर करतात.
शिवानंब बाबा यांचे या वयात योगाभ्यास करण्याचे कौशल्य बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ट्विट केल्यानंतर चर्चेत आले होते. शिल्पा शेट्टीने त्यांचा व्हिडीओ शेअर करत त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती.