रायपूर : छत्तीसगडमध्ये भाजपने शेतकऱ्यांकडून ३१०० रुपये प्रतिक्विंटल दराने धान खरेदी, महिलांना वर्षाला १२ हजार रुपये, पाचशे रुपयांना एलपीजी सिलिंडर तर दोन वर्षांत एक लाख तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २० हमी असलेला जाहीरनामा प्रसिद्ध केला. गरिबांना अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घडविण्यात येईल, असे आश्वासनही भाजपने छत्तीसगडच्या मतदारांना दिले आहे.
‘मोदीज गॅरंटी २०२३ फॉर छत्तीसगड’ nजाहीरनाम्याला ‘मोदीज गॅरंटी २०२३ फॉर छत्तीसगड’ असे नाव देण्यात आले आहे. n ‘कृषक उन्नती योजना’ सुरू करण्यात येईल. त्याअंतर्गत शेतकऱ्यांकडून प्रतिएकर २१ क्विंटल धानाची ३१०० रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी हाेईल. ‘महातारी वंदन योजने’अंतर्गत विवाहित महिलांना दरवर्षी १२ हजार रुपये मिळतील.nप्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १८ लाख घरे बांधली जातील. राज्यातील प्रत्येक घरात स्वच्छ नळाचे पाणी पुरवठा केला जाईल. nभूमिहीन शेतमजुरांना वार्षिक १०,००० रुपये दिले जातील. केंद्राच्या ‘आयुष्मान भारत योजने’अंतर्गत ५ लाख रुपयांसह, प्रत्येक कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून अतिरिक्त ५ लाख रुपये असे एकूण १० लाख रुपये दिले जातील.
विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मासिक प्रवास भत्ता देण्याची तसेच एम्सच्या धर्तीवर छत्तीसगड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि प्रत्येक विभागात आयआयटीच्या धर्तीवर छत्तीसगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी निर्माण करण्यात येईल.
राज्यात शक्तिपीठ योजना लागू करण्यात येणार असून छत्तीसगडमधील गरीब जनतेला रामलल्ला दर्शन घडविण्यासाठी ‘रामलल्ला दर्शन योजना’ सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.