नवी दिल्ली - फ्लाईंग सीख आणि भारताचे माजी दिग्गज धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांचे कोरोनामुळे शुक्रवारी रात्री निधन झाले. एक महिन्यापासून त्यांचा कोरोनाविरुद्ध लढा सुरू होता. मिल्खा सिंग यांच्या पत्नी व भारताच्या व्हॉलिबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौर यांनी कोरोना संक्रमणामुळे पाच दिवसांपूर्वी अखेरचा श्वास घेतला होता. त्यानंतर, अल्पावधीच मिल्खा सिंग यांनीही जगाचा निरोप घेतला. पती-पत्नीमधील अखंड प्रेमाचा धागा मृत्यूनंतरही जगाने पाहिला. त्यामुळचे, त्यांच्या अंत्ययात्रेवेळीही त्यांची पत्नीची छायाचित्रातून सोबत त्यांना मिळाली.
निर्मल मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर मोहाली येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, कोरोनाविरुद्ध मृत्युशी त्यांची झुंज अपयशी ठरली. निर्मल यांच्या निधनाबाबत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तीव्र शोक व्यक्त केला. त्यानंतर, 5 दिवसांनीच मिल्खा सिंग यांचेही निधन झाले. मात्र, मिल्खा यांच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या अंतिम यात्रेवेळीही त्यांच्या पत्नी छायाचित्राच्या रुपाने त्यांच्यासमेवत होते. प्रेमाचे भावनिक बंध जपणारा हा फोटो पाहिल्यानंतर खरं प्रेम कशाला म्हणतात, याचाच साक्षात्कार म्हणावं लागेल.
भारताचा माजी तडाखेबंद फलंदाज विरेंदर सेहवागने आपल्या ट्विटरवरुन मिल्खा सिंग यांच्या अंत्ययात्रेचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मिल्खा सिंग यांच्या हातात पत्नी निर्मल कौर यांचे छायाचित्र दिसून येते. मनाला भावूक स्पर्श करणारा हा फोटो अखंड प्रेमाची साक्ष देत आहे. 'आपल्या लाडक्या पत्नी निर्मलजींकडे जाण्यासाठीच त्यांनी धाव घेतली', असे भावनिक उद्गार सेहवागने काढले आहेत. तसेच, आगामी कित्येक वर्षांसाठी त्यांच्या जीवनायुष्याची प्रेरदाणायी गोष्ट साजरी होत राहिल.