अहमदाबाद - पहिल्यांदाच आमदारपदी निवडून आलेले भूपेंद्र पटेल यांची गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून राज्य भाजप विधिमंडळ पक्षाच्या रविवारी झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. पटेल आज, सोमवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे, गणेशोत्सवातही पटेल यांच्याघरी दिवाळीचे वातावरण आहे. पटेल यांच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याने पटेल यांच्या कुटुंबीयांना अत्यानंद झाला असून सेलिब्रेशनही सुरू आहे.
विजय रुपानी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर हालचालींना वेग आला होता. नाराज असलेल्या पटेल समुदायाचे समाधान करण्यासाठी भूपेंद्र पटेल यांची निवड केल्याचे सांगण्यात आले. भूपेंद्र पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय आहेत. पटेल यांच्या निवडीच्या घोषणेनंतर त्यांच्या अहमदाबाद येथील निवासस्थानी नातेवाईक, शेजारी आणि मित्र परीवाराने गर्दी केली होती. तसेच, या निवडीचे सेलिब्रेशनही करण्यात आले. आमच्यासाठी ही अनपेक्षित सरप्राईज आहे. त्यामुळेच, घरी दिवाळीसारखं वातावरण बनलंय, असे भूपेंद्र यांच्या पत्नी हेतल पटेल यांनी म्हटलं आहे.
आमच्यासाठी हा अनपेक्षित असा आश्चयार्चा धक्का आहे. आम्ही कधीही कल्पनासुद्धा केली नव्हती की, थेट मुख्यमंत्रीपद आमच्या घरात येईल. आता, आम्हाला भुपेंद्र यांचं नीटनेटकं स्वागत करण्यासही वेळ नाही. मात्र, दिवाळीसारखं वातावरण आमच्या कुटुंबात निर्माण झालंय, असे हेतल पटेल यांनी म्हटलं. तर, मोदींनी आम्हाला हे सरप्राईज दिलं, त्याबद्दल भूपेंद्र यांचे लहान भाऊ केतन पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.
भूपेंद्र पटेल हे गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून आज दुपारी शपथ घेणार आहेत. पुढच्या वर्षी गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत विजय रुपानी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला विजय मिळणे शक्य नाही, असा निष्कर्ष पक्षाच्या सर्वेक्षणातून समोर आला होता. पक्षात रुपानी यांच्याविषयी नाराजी होती. ते राज्यातील कोरोना स्थिती नीटपणे हाताळण्यात अयशस्वी ठरल्याने त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास श्रेष्ठींनी सांगितले. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव विजय रुपानी यांनीच मांडला व तो एकमताने संमत झाला.
भाजपचे धक्कातंत्र कायम
- गुजरातचे भावी मुख्यमंत्री म्हणून मनसुख मांडवीय, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांसह काही जणांची नावे शर्यतीत होती. भूपेंद्र पटेल यांचे नाव अजिबात चर्चेत नव्हते. अशाच नावाची निवड करून भाजपचे आपले धक्कातंत्र कायम ठेवले आहे.