नवी दिल्ली - एकीकडे लडाखमध्ये चीनची घुसखोरी आणि चिनी सैनिकांसोबतच्या झटापटीत २० जवानांना वीरमरण आल्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे राजधानीमध्ये चीनच्या घुसखोरीवरून सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये दररोज आरोप प्रत्यारोपांचे नवनवे अंक सादर होत आहेत. आज राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांना सरेंडर मोदी अशी उपमा दिल्याने भाजपाचा तीळपापड झाला आहे. राहुल गांधींचे हे विधान लाजिरवाणे असून, राहुल गांधी जी भाषा बोलत आहेत, तशी भाषा शत्रूराष्ट्राचे नेतेही वापरत नाहीत, असा टोला भाजपाने लगावला आहे.
जपान टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेला एक लेख शेअर करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना सरेंडर मोदी अशी उपमा दिली होती. त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. ‘’राहुल गांधी हे मर्यादांचे उल्लंघन करत आहेत. ते देशाचा अपमान करत आहेत. ही बाब देशाची जनता खपवून घेणार नाही. राहुल गांधी ज्या प्रकारची भाषा बोलत आहेत. तशी भाषा शत्रू राष्ट्रांचे नेतेसुद्धा बोलू शकत नाही. भारत आणि चीन यांच्यात तणाव निर्माण झाल्यापासून राहुल गांधी दररोज पंतप्रधानांचा अवमान करत आहेत. तसेच ते ज्या प्रकारची भाषा वापरत आहेत, त्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे. अन्यथा देशातील जनता काँग्रेसला कधी माफ करणार नाही.’’ असे शाहनवाझ हुसेन यांनी सांगितले.
दरम्यान, राहुल गांधींच्या आक्रमक टीकेनंतर भाजपाचे अनेक नेते त्यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. आसाम सरकारमध्ये मंत्री असलेल्या हेमंत बिस्वा शर्मा यांनीही राहुल गांधींनी टोला लगावला आहे. राहुल गांधी, तुम्ही एवढे निराश झाला आहात की, तुम्हाला व्यवस्थित लिहिताही येत नाही आहे. आत्मसमर्पण करणे हा गांधी-नेहरू परिवाराचा हॉलमार्क आहे. १९६२ मध्ये पंडित नेहरू यांनी आसाम चीनला जवळपास देऊनच टाकला होता. जेव्हा चीनने बोमडिलावर कब्जा केला तेव्हा माझे हृदय आसामी लोकांसाठी रडत आहे, असे नेहरूंनी म्हटले होते, असा आरोप हेमंत बिस्वा शर्मा यांनी केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या