नवी दिल्ली - देशात कोरोनाचा फैलाव वाढू लागल्यापासून कोरोनाला रोखण्यासाठीच्या विविध उपायांचा अवलंब सुरू झाला आहे. दरम्यान, वैद्यकीय क्षेत्रात वापरला जाणारा एन-९५ मास्क कोरोनाविरोधातील प्रभावी हत्यार म्हणून सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय झाले आहे. घराबाहेर पडताना एन-९५ मास्कचा लोकांकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जात असून, त्यामुळे या मास्कची मागणीही वाढली आहे. तर, अनेकजण फेस शिल्डचा वापर करुन कोरोनाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण मास्क व फेस शिल्ड याचा एकत्रितपणे वापर करतात. मात्र, मास्क आणि फेस शिल्डचा एकत्रितपणे वापर केल्यासही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येणार नाही. भारत आणि अमेरिकेतील संशोधन अभ्यासातून याबाबतची माहिती पुढे आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एन 95 हा मास्क कोरोनाचा फैलाव रोखण्याच्याबाबतीत निरुपयोगी असल्याचे म्हटले होते. तसेच याबाबत विविध राज्ये आणि केंद्रशासित राज्यांना पत्र लिहून वापराबाबत सूचनाही केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा विभागाचे महासंचालक राजीव गर्ग यांनी याबाबतचे पत्र लिहिले होते. या पत्राच्या माधयमातून व्हॉल्व्ड रेस्पिरेटर लावलेल्या मास्कबाबत इशारा देण्यात आला. अशा प्रकारचा मास्क कोरोनाचा फैलाव रोखू शकत नाही. तसेच ही बाब कोविड-१९ ला रोखण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांच्या विपरित आहे, असे या पत्रात म्हटले होते. त्यानंतर, आता भारत आणि अमेरिकेतील एका अभ्यास संशोधनातून फेस शिल्ड व मास्कच्या वापरानेही कोरोनाला थांबवता येत नसल्याचे म्हटले आहे.
कोविडबाधित व्यक्तीला खोकला आल्यास, एरोसोलिज्ड ड्रॉपलेट्सद्वारे निघणाऱ्या व्हायरसचे विषाणू सहजरित्या फेसशिल्डभोवती फिरण्यास सक्षम असतात. फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटीतील सीटेकचे संचालक, प्राध्यापक, विभागप्रमुख मनहर धनक यांनी सांगितले की, वेळेनुसार हे ड्रॉपलेट्स पुढील व मागील बाजून मोठ्या गतीने पसरतात. पण, वेळेनुसार यांच्या तीव्रतेत कमकुमवतपणा येतो. शोध अभ्यासाचे प्रमुख लेखक सिद्धार्ध वर्मा हे असून यांच्यासमवेतच प्राध्यापक मनहर धनक यांनी हा प्रबंध लिहिला आहे.
शिल्डच्या मदतीने चेहऱ्यावर पडण्यापासून ड्रॉपलेट्सना थांबवता येते, पण शिल्डवरील आवरणावर पडताच हे विषाणू इकडे तिकडे पसरण्यास सुरुवात होते, हे आम्हा पाहिले आहे, असे धनक यांनी म्हटले. फिजिक्स ऑफ फ्लुइड्स अकॅडमिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधन अभ्यासात एन 95 मास्कबाबतही माहिती देण्यात आली आहे. मास्कवर असलेल्या एक्सहेलेशन वॉल्वच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात ड्रॉपलेट्स व्यक्तीच्या शरीरापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे, फेसशिल्ड आणि मास्क या दोन्हीचा एकत्र वापर केल्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणे शक्य नसल्याचे दिसून येते. त्यामुळे विना वॉल्ववाल्या मास्कचा वापरच कोरोना व्हायरसच्या बचावासाठी उपयुक्त आहे.