नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्पात तरी मतदानाचा टक्का वाढविण्याची संधी महाराष्ट्राने गमावली. राज्यातील १३ पैकी बहुतांश मतदारसंघ शहरी भागातील असल्याने येथील मतदार मतदानासाठी घराबाहेर पडत नसल्याचा कलंक पुसण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले होते. परंतु तरीही राज्यात देशातील नीचांकी ५४.३३ टक्के मतदान झाले. राज्यात दिंडोरीत सर्वाधिक ६२.६६ टक्के, तर सर्वात कमी मतदान कल्याणमध्ये ४७.०८ टक्के झाले.
देशातील आठ राज्यांतील ४९ मतदारसंघात सरासरी ६०.३९ टक्के मतदान झाले. चौथ्या टप्प्याप्रमाणे यावेळीही पश्चिम बंगालने देशात सर्वाधिक ७६.५६ टक्के मतदानासह देशात पहिला क्रमांक पटकावला. बंगालनंतर लडाख दुसऱ्या क्रमांकावर राहिला. कलम ३७० हटविल्यानंतर स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश झालेल्या लडाखमध्ये ६९.६२ टक्के मतदानाची नोंद झाली. दरम्यान, पाचव्या टप्प्याचे मतदान झालेल्या अनेक मतदारसंघात सोमवारी तापमान अधिक होते. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये उष्णतेची लाट होती. महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत प्रचंड उकाड्यामुळे मतदानासाठी रांगेत लागलेले मतदार घामाघूम झाल्याचे दिसत होते. लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासह ओडिशा विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ३५ जागांसाठी सरासरी ६९.३४% मतदान झाले.
पश्चिम बंगालमध्ये मागील वेळेप्रमाणेच अनेक ठिकाणी तृणमूल काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. हुगळी येथे भाजप उमेदवार लॉकेट चटर्जी मतदानासाठी जात असताना तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. हावडा, बोनगाव येथेही वादावादीच्या घटना घडल्या. उत्तर प्रदेशच्या महाेबा येथे कर्तव्यावरील एका सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला. त्याशिवाय देशातील विविध मतदान केंद्रांवर मतदानावेळी ईव्हीएम बंद पडल्याच्या १,०३६ तक्रारी आयोगाकडे नोंदविण्यात आल्या.
संपूर्ण राज्याचे मतदान -२०१९च्या तुलनेत वाढ घट -