वाराणसी : एनडीएचे नेते नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधी आज वाराणसीमध्ये कार्यकर्त्यांना धन्यवाद रॅलीमध्ये संबोधित केले. याआधी त्यांनी बाबा विश्वनाथ मंदिरात पूजा केली. पं. दीनदयाल हस्तकला संकुलामध्ये झालेल्या या रॅलीमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाहा यांनी मोदी हे देशातील सर्वांत यशस्वी मुख्यमंत्री असल्याचे सांगितले.
भाषणाच्या सुरवातीला मोदींनी हर हर महादेवचा नारा दिला. कार्यकर्त्यांचा आदेशाचे पालन करतो. त्यांनी सांगितले की, महिनाभर तुम्ही काशीमध्ये पाऊल ठेऊ शकत नाही. देशाने मला पंतप्रधान म्हणून जरी निवडले असेल पण मी तुमच्यासाठी कार्यकर्ताच असेन. तुमचा आदेश हा प्राधान्याने असेल, असे मोदी म्हणाले.
वाराणसीमध्ये कार्यकर्त्यांनीच प्रचार केला. काशीच्या लोकांनी ही निवडणूक एक पर्व मानले, यामुळे येथील प्रत्येक कार्यकर्ता डिस्टिंक्शन मार्कनी पास झाला आहे. देशातील राजकीय वातावरणात हिंसकपणा वाढला आहे. बंगाल, केरळ, त्रिपुरा आणि काश्मीरमध्ये आमच्या हजारो कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये तर सुरुच आहे, असा आरोप मोदी यांनी केला.
आमच्या सरकारने सर्व जातींना एकत्र घेऊन जाण्याचे काम केले आहे. असे केले नसते तर आम्ही तिथेच राहिलो असतो. सवर्णांना आरक्षण हा त्याचाच भाग आहे. संसदेचा वापर चर्चा करण्यासाठी व्हायला हवा. जेव्हा विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसतो, तेव्हा ते दंगा करतात. विरोधकांकडे संख्याबळ नसणे हे त्यांचेच कृत्य आहे. त्रिपुरामध्ये डाव्यांच्या सरकारवेळी विरोधकांना संपविण्यात आले होते. मात्र, आमची सत्ता आल्यानंतर तेथे हा बदल झाला आहे, असेही मोदी यांनी सांगितले.