ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - अयोध्या, गंगा आणि तिरंग्यासाठी मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार असून त्यासाठी जीव गेला तरी बेहत्तर अशी प्रतिक्रिया उमा भारती यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना आपण आज रात्री अयोध्येला जाऊन दर्शन घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
बाबरी मशीद खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह 13 जणांवर गुन्हेगारी खटला चालवण्याचा निर्णय दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्याप्रकरणी सीबीआयच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती पीसी घोष आणि न्यायमूर्ती रोहिंटन नरीमन यांच्या खंडपीठाने सीबीआयच्या याचिकेवर हा निकाल दिला आहे.
राम मंदिर आंदोलनात भाग घेतल्याचा मला अभिमान आहे. अयोध्येसाठी आपली जीव देण्याचीही तयारी असून राम मंदिर होणारच असा विश्वास उमा भारतींनी व्यक्त केला. तसंच कोणतंही कारस्थान नव्हतं, सर्व खुल्लम खुल्ला होतं. मनात असं काहीच नव्हतं असंही उमा भारतींनी सांगितलं आहे.
काँग्रेसकडून राजीनाम्याची मागणी होत असल्याच्या प्रश्नावर बोलताना आणीबाणी आणि 1984 च्या दंगलीसाठी जबाबदार असणा-या पक्षाला माझा राजीनामा मागण्याचा हक्क नाही असा टोला उमा भारतींनी लगावला.