हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लोकसभेत कामकाज सुरळीत चालावे यासाठी भाजप आपल्या मित्रपक्षांना अत्यंत सांभाळून घेत आहे. तर, राज्यसभेतही भाजपसाठी मार्ग सोपा नसल्याचे दिसून येत आहे. कारण, भाजपकडे स्वत:चे ९० सदस्य आहेत. मात्र, महत्त्वपूर्ण विधेयके मंजूर करण्यासाठी पक्षाला आणखी खासदारांची गरज भासणार आहे. विशेषतः सभागृहात दोनतृतीयांश खासदारांचा पाठिंबा आवश्यक असतो.
राज्यसभेत २४५ सदस्यांच्या सभागृहात सध्या १५ पदे रिक्त आहेत. १० निवडून आलेले सदस्य आणि पाच नामनिर्देशित सदस्यांचा यात समावेश आहे. यात ७ नामनिर्देशित खासदारांचा समावेश केला तरी भाजप बहुमताच्या संख्येपासून किंचित खाली आहे. पक्षाला जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरच्या समर्थनाची आवश्यकता असेल त्यांचे राज्यसभेत ११ खासदार आहेत. तर, नवीन पटनायक यांच्या बीजेडीचे ९ खासदार आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपच्या नेत्यांनी वायएसआर आणि बीजेडीच्या नेत्यांवर कठोर टीका केल्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळविणे भाजपसाठी अत्यंत कठीण काम असणार आहे. अर्थात हे पक्ष काँग्रेससोबत जाणार नाहीत. पण, भाजपला आव्हान देण्यासाठी हे पक्ष इंडिया आघाडीसोबत हातमिळवणी करू शकतात.
इंडिया आघाडीकडे ८० सदस्यराज्यसभेत काँग्रेसचे २६ खासदार असू शकतात. पण, इंडिया आघाडीत आता सुमारे ८० खासदार आहेत. तृणमूल (१३), आप (१०), डीएमके (१०), राजद (५), सीपीएम (५), सपा (४) आणि इतर अनेकांमुळे सरकारचे काम कठीण होऊ शकते. बीआरएस (५) आणि बसपा (१) भाजपला पूर्वीप्रमाणे पाठिंबा देणार नाहीत.