विवाहित मुलगीही अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळण्यास पात्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 01:59 AM2021-01-15T01:59:28+5:302021-01-15T01:59:53+5:30
अलाहाबाद उच्च न्यायालय; मुलाप्रमाणेच मुलीचाही हक्क
लखनऊ : वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी त्यांची विवाहित मुलगीही अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळण्यास पात्र आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.
आपल्या निकालपत्रात न्या. जे. जे. मुनीर यांनी म्हटले आहे की, सरकारी सेवेत असलेल्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यास त्यांच्या मुलाप्रमाणेच मुलगीही पात्र ठरू शकते. मुलीचे लग्न झालेले असो वा नसो, तो मुद्दा नोकरी मिळण्यासाठी महत्त्वाचा नाही.
वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळविण्यासाठी मंजुल श्रीवास्तव हिने केलेला अर्ज प्रयागराज येथील जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याने फेटाळून लावला होता. मंजुल विवाहित असल्याने तिला वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळू शकत नाही, असे या अधिकाऱ्याने २५ जून रोजीच्या आपल्या आदेशात म्हटले होते.
हे तर राज्यघटनाविरोधी कृत्य
अनुकंपा तत्त्वावर नोकरी देताना विवाहित मुलींना त्या कुटुंबाचा भाग समजले जात नाही हे राज्यघटनाविरोधी आहे, असा निकाल याआधी विमला श्रीवास्तव खटल्यात देण्यात आला होता. त्याचाही दाखला उच्च न्यायालयाने दिला आहे.