न्यूयॉर्क : अफगाणिस्तानचा वापर दहशतवाद व घातपाती कारवायांसाठी होणार नाही याची जगाने दक्षता घेतली पाहिजे. दहशतवादाचा राजकीय हत्यार म्हणून वापर करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, हा भस्मासुर तुमच्यावरही उलटू शकतो, असा खणखणीत इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्या देशाला दिला. संयुक्त राष्ट्रांच्या ७६व्या आमसभेत शनिवारी केलेल्या भाषणात मोदी यांनी चीनवरही नाव न घेता टीका केली. मात्र, मोदींच्या भाषणावेळी सभागृहात गर्दी नसल्याने माजीमंत्री काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी मोदींना चिमटा काढलाय.
पी चिदंबरम यांनी ट्विट करुन युएनमधील मोदींच्या भाषणावर भाष्य केलंय. त्यामध्ये, मोदींच्या भाषणाची एकप्रकारे खिल्लीच उडविण्याचं काम त्यांनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी युएनच्या सर्वसाधारण सभेत भाषण करत असताना सभागृहात फक्त काहीच सीट भरलेले होते. त्यामुळे, मी निराश झालो आहे, त्याहीपेक्षा निराश कुणीही टाळी न वाजवल्याने झालो, असे उपहासात्मक ट्विट पी चिदंबरम यांनी केलं आहे. युएनमधील भारताचे स्थायी सदस्यत्वाचे मिशन मोठ्या प्रमाणात वाढलंय, असेही चिदंबरम यांनी म्हटलं आहे.
मोदींचा नाव न घेता चीनवर निशाणा
मोदी म्हणाले की, आपले समुद्र हा आपला मोठा वारसा आहे. जागतिक व्यापारासाठी समुद्रमार्ग हे अतिशय महत्त्वाचे आहेत. विस्तारवादी भूमिका घेणाऱ्यांपासून जगाने स्वत:चे रक्षण केले पाहिजे. जागतिक कायदे, मूल्ये, नियमांच्या संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक बळकट करण्याची आवश्यकता आहे. दहशतवादाचा इतर देशांविरोधात वापर करणाऱ्यांनाही या गोष्टीपासून धोका आहे. योग्यवेळी योग्य काम पूर्ण नाही केले तर ते काम असफल होते, हे आर्य चाणक्य यांचे वचन उद्धृत करत मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या कामात सुधारणा करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
भारताने सर्वात आधी बनविली डीएनए लस
भारताने जगात सर्वात आधी डीएनए लस विकसित केली. ही लस १२ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला दिली जाऊ शकते. कोरोनाशी मुकाबला करण्याकरिता भारत आरएनए पद्धतीची, तसेच नाकावाटे घेता येणारी लस तयार करण्यात गुंतला आहे. जगातील सर्व लस कंपन्यांनी भारतात उत्पादनांची निर्मिती इथे सुरू करावी, असे आवाहनही मोदी यांनी यावेळी केले.