नवी दिल्ली : वाहनात मागील सीटवर बसलेल्या लोकांना असे वाटते की, त्यांना सीट बेल्टची गरज नाही. मात्र, समोरच्या आणि मागील सीटवरील प्रवाशांना सीट बेल्ट आवश्यक आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. आपण कोणत्याही अपघातावर कोणतेही भाष्य करू इच्छित नाहीत, असे गडकरी यांनी आयएएच्या ग्लोबल समिटमध्ये स्पष्ट केले. तथापि, सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर रस्ते सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सायरस मिस्त्री हे वाहनात मागील सीटवर होते आणि त्यांनी सीट बेल्टचा उपयोग केला नव्हता. लोकांच्या सहकार्याशिवाय रस्ते अपघात रोखण्याचा कोणताही प्रयत्न निष्फळ ठरेल, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. गडकरी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनीही कार सुरक्षेचे नियम पाळले नसल्याचे दिसून आलेले आहे. मी चार मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास केला. त्यांचे नाव मला विचारू नका. मी पुढील सीटवर होतो. आपण जर बेल्टचा वापर केला नाही तर अलार्म होतो. मात्र, अलार्म बंद होण्यासाठी चालकाने क्लिप लावली होती. हे प्रकार रोखण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. कारसाठी सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा प्रयत्न आमचे मंत्रालय करत आहे. सायरस मिस्त्री यांच्या दुर्घटनेबाबत त्यांनी दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले की, मिस्त्री हे माझे चांगले मित्र होते. आमची ही समस्या आहे की, दरवर्षी पाच लाख अपघात होतात आणि त्यात दीड लाख मृत्यू होतात.
काही मुख्यमंत्रीही कारमध्ये लावत नाही सीट बेल्ट, नितीन गडकरी यांची उद्विग्नता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2022 10:20 AM