चुकीचे मेसेज फॉरवर्ड करणाराही दोषीच, जबाबदारीने वागा : हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 10:19 AM2023-07-17T10:19:01+5:302023-07-17T10:19:31+5:30
एप्रिल २०१८ मध्ये भाजप नेते एस.व्ही. शेखर यांनी फेसबुकवर महिला पत्रकारांविरुद्ध अपमानास्पद आणि असभ्य टिप्पणी फॉरवर्ड केली
डॉ. खुशालचंद बाहेती
चेन्नई : मेसेज फॉरवर्ड करण्याचा अर्थ त्यातील मजकुराला मान्यता देणे, असा आहे. जर त्यात अपमानास्पद मजकूर असेल, तर फॅारवर्ड करणाऱ्यालाही त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे मद्रास हायकोर्टाने म्हटले आहे.
एप्रिल २०१८ मध्ये भाजप नेते एस.व्ही. शेखर यांनी फेसबुकवर महिला पत्रकारांविरुद्ध अपमानास्पद आणि असभ्य टिप्पणी फॉरवर्ड केली. नंतर गुन्हे दाखल झाले. शेखर यांनी गुन्हे रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांचा दावा होता की, त्यांनी आलेला मेसेज न वाचता केवळ फॉरवर्ड केला होता. नंतर त्यांनी त्याचदिवशी अपमानास्पद पोस्ट काढून टाकली आणि माफीही मागितली होती. केलेली याचिका फेटाळताना हायकोर्टाने म्हटले की, यामुळे तुम्ही केलेला गुन्हा कमी होत नाही. प्रत्येकाने सामाजिक जबाबदारीचे पालन केले पाहिजे.
हा मेसेज कायमचा पुरावा
आपण आभासी माहितीच्या अतिसाराने त्रस्त आहोत. इथे प्रत्येकावर संदेशांचा भडिमार होत आहे. समाजमाध्यमांमध्ये संदेशाच्या रूपात जी देवाणघेवाण होते त्याचा अल्पावधीतच फार मोठा प्रभाव पडतो, म्हणूनच संदेश तयार करताना किंवा फॉरवर्ड करताना प्रत्येकाने सामाजिक जबाबदारीचे पालन केले पाहिजे. पाठवलेला/ फॉरवर्ड केलेला मेसेज हा कायमचा पुरावा बनतो. यामुळे होणारी हानी भरून काढणे जवळजवळ अशक्य आहे.
- न्यायमूर्ती आनंद व्यंकटेश