नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील तिसऱ्या दिवसाच्या कामाजाला सुरुवात झाली. मात्र, संसदेच्या दोन्ही सभागृहात खासदारांनी एकत्र येत गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. राज्यसभा खासदारांनी हातात फलक घेऊन सभापतींच्या दालनात गोंधळ घातला. त्यावेळी सभापती वैंकय्या नायडू यांनी चक्क उभे राहून, हात जोडून, निदान आज तरी संसदेचं कामकाज चालू द्या, अशी आर्जव केली.
संसदेवरील हल्ल्याला आज 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना पंतप्रधान, उपराष्ट्रपती, मंत्री अन् खासदारांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर, ससंदेच्या दोन्ही सभागृहातही मौन धारण करुन जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांनंतर, कामकाजाला सुरुवात करण्यात आली. मात्र, राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोधळ घालत कामकाम बंद पाडले. कावेरी नदीवर बंधारा बांधण्याच्या विरोधात आणि इतरही मुद्द्यांना धरुन डीएके, एआयएडीएमके खासदारांसह अन्य खासदारांनी गोंधळ घातला. तसेच सभागृहाच्या वेलमध्ये येऊन नारेबाजी केली. त्यामुळे 10 मनिटानंतर बंद केलेलं कामकाज एक दिवसासाठी तहकूब करण्यात आले.
सभापती, वैंकय्या नायडू यांनी गोंधळ घालणाऱ्या खासदारांना हात जोडून विनंती केली. तसेच, निदान आज तरी संसदेचं कामकाज चालू द्या, कारण आज तो दिवस आहे, ज्यादिवशी संसदेची रक्षा करण्यासाठी 9 जवानांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. विशेष म्हणजे आत्ताच आपण त्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली आहे, याचे तरी भान ठेवा, अशा शब्दात नायडू यांनी खासदारांना खडसावले. मात्र, खासदारांचा गोंधळ सुरूच राहिला, त्यामुळे अखेर शुक्रवारपर्यंत संसदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं.