नवी दिल्ली : देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेला जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हय्या कुमार हा विद्यापीठातील देशविरोधी घोषणा देणाऱ्या कार्यक्रमात केवळ सहभागीच झाला नाही, तर त्यानेच प्रत्यक्षात हा कार्यक्रम आयोजित केला होता, असा दावा दिल्ली पोलिसांनी बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात केला. मंगळवारी रात्री ताब्यात घेतलेल्या उमर खालीद आणि अनिर्बन भट्टाचार्य या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पाच तासांच्या चौकशीनंतर अटक केली.दिल्ली पोलिसांनी न्या. प्रतिभा राणी यांच्या समक्ष सादर केलेल्या १३ पानी स्थिती अहवालात ९ फेब्रुवारी रोजीच्या घडामोडींची माहिती दिली. कन्हय्या आणि अन्य आरोपींसह चेहरे झाकून घेतलेले काही विदेशी लोकही या कार्यक्रमाला उपस्थित होते, असा दावाही पोलिसांनी केला. न्यायालयाने अहवाल विचारात घेत कन्हय्याच्या जामिनावर २९ फेब्रुवारी रोजी सुनावणी निश्चित केली आहे.भाजप आमदारावर गुन्हा जेएनयूसंबंधी भूमिकेबाबत राहुल गांधी यांना देशद्रोही म्हणणारे राजस्थानचे आमदार कैलाश चौधरी आणि अन्य चौघांविरुद्ध मंगळवारी अमेठी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जेएनयूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी...पोलिसांनी जेएनयूच्या अधिकाऱ्यांनी पुरविलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी चालविली आहे. देशात देशविरोधी मोहीम चालविण्याशी संबंध असलेल्या व्यक्तीने विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केला होता काय, याचा पोलिसांनी तपास चालविला आहे. चेहरे झाकलेले लोक कोण आहेत, याचा उलगडा व्हायचा आहे.खालिद कुठे दडला होता? पोलिसांनी पाच तासांच्या चौकशीत खालीद आणि अनिर्बन कुठे दडून होते याची चौकशी केली. या दोघांचा देशद्रोहाच्या प्रकरणाशी संबंध आहे काय, याचा तपास केला जात आहे. पोलिसांना आता रामा नागा, आशुतोष कुमार आणि अनंत प्रकाश या तीन विद्यार्थ्यांच्या शरणागतीची प्रतीक्षा आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठात सरकार व भाजपविरोधी कार्यक्रम नकोतअलिगढ : विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांना कोणताही सरकारविरोधी, भाजपविरोधी आणि राष्ट्रविरोधी कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी देऊ नका, असे इशारेवजा पत्र भारतीय जनता पक्षाचे खासदार सतीश गौतम यांनी अलिगढ विद्यापीठाचे कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) जमीरउद्दीन काझी यांना पाठवले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादग्रस्त कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पत्र लिहिले आहे.
कार्यक्रमाचा आयोजक कन्हय्याच- हायकोर्टात दावा
By admin | Published: February 25, 2016 3:00 AM