- विलास बारी
जळगाव : सौर मंडळातील घडामोडींमुळे अचानक सूर्यावरील डागांची संख्या वाढली आहे. यामुळे चुंबकीय सौर वादळाची निर्मिती होऊन झोत सूर्याच्या वातावरणातून संपूर्ण सौर मंडळाकडे फेकला जात आहे.
येत्या काही दिवसांत हा चुंबकीय लहरींचा झोत पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पृथ्वीवरील दळणवळण व्यवस्थेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता खगोल अभ्यासकांनी वर्तविली आहे. जळगाव येथील खगोल अभ्यासक सतीश पाटील हे २५ वर्षांपासून सूर्याचे निरीक्षण करीत आहेत. त्यातच शनिवारी सकाळी निरीक्षण करताना त्यांना सूर्यावरील डागांची संख्या वाढलेली दिसली. त्यातून सौरज्वाला व सौरउद्रेक पाहायला मिळाला.
हे डाग ५ गटांत विभागले आहेत. ध्रुवीय प्रकाश यामुळे साैर चुंबकीय लहरी आणि पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र यांची टक्कर झाल्यामुळे दोन्ही धृवांवर हिरव्या रंगाचा प्रकाश दिसेल. - सतीश पाटील, खगोल, अभ्यासक, जळगाव.
न्यूक्लिअर फ्युजनमुळे होते अशी परिस्थिती-
न्युक्लिअर फ्युजनद्वारे सुर्यावर ऊर्जा निर्माण होते. सूर्याच्या उर्जेचा मुख्य स्राेत हायड्रोजन वायू आहे. हायड्रोजनच्या दोन अणूंचे केंद्रकीय एकीकरण होऊन हेलियमचा एक रेणू तयार होतो. अणुस्फोटाच्या नेमकी विरोधी ही स्थिती असते.
२०१३ नंतर वादळाची स्थिती
साधारणपणे प्रत्येक ११ वर्षांनी अशा वादळाची स्थिती निर्माण होत असते. सन १९८०, १९९० व ऑगस्ट २०१३ मध्ये अशी स्थिती उद्भवली होती. त्यावेळी सूर्यावर ६९ डाग आढळून आले होते.