ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. ७ - 'तिने' सुद्धा अन्य मुलींप्रमाणे नववधूसारखे नटून मंत्रोच्चाराच्या पठणात अग्निसमोर सात फेरे घेण्याचे स्वप्न बघितले होते. तिच्या विवाहाचा दिवस जवळ येत होता. डोळयात अनेक स्वप्ने साठवून ती विवाहाची तयारी करत होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. विवाहाच्या काही दिवस आधी अचानक तिला मोठा अपघात झाला आणि सभागृहाऐवजी रुग्णवाहिकेत स्ट्रेचरवर झोपून तिला लग्नगाठ बांधावी लागली.
नेत्रावती असे या मुलीचे नाव असून ठरलेल्या दिवशी लग्न करण्यासाठी नेत्रावती रुग्णावाहिकेतून थेट चित्रदुर्ग मठात आली आणि विवाहबद्ध झाली. बीजी केरी गावात रहाणारी नेत्रावती शेतकरी कुटुंबातील आहे. गुरुस्वामी बरोबर भेट झाल्यानंतर पहिल्या भेटीत दोघांचे प्रेमाचे सुरु जुळले. गुरुस्वामी पेशाने तंत्रज्ञ आहे.
पाच जूनला अमावस्येला चित्रदुर्ग मठात सामूहिक विवाह सोहळयात लग्न करण्याचा दोघांनी निर्णय घेतला होता. पण २३ मे रोजी नेत्रावती गुरुस्वामी बरोबर चित्रदुर्ग गडावर फिरण्यासाठी गेलेली असताना पायघसरुन खाली पडली. तिला मोठा अपघात झाला. तिला रुग्णालयात दाखल केले.
नेत्रावतीची दुखापत गंभीर असल्याने तिला पाच जूनला विवाहाला करणे अशक्य होते. तिला उठता, बसता येत नव्हेत. मात्र आपण त्याच तारखेला लग्न करायचे यावर नेत्रावती ठाम होती. अखेर डॉक्टरांनी तिला परवानगी दिली आणि नेत्रावती रुग्णवाहिकेतून मठात आली. तिथे मंत्रोच्चाराच्या पठणात स्ट्रेचरवर झोपलेल्या नेत्रावतीच्या गळयात गुरुस्वामीने मंगळसूत्र बांधले.