ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी अखेर गुरुवारी एअर इंडियाच्या विमानातून प्रवास केला. हवाई प्रवासावरील बंदी हटवल्यानंतर त्यांनी प्रथमच हैदराबाद ते दिल्ली असा बिझनेस क्लासमधून प्रवास केला. बिझनेस क्लासचे तिकीट असतानाही इकॉनॉमी क्लासमध्ये बसवले म्हणून मागच्या महिन्यात 23 मार्चला त्यांनी एअर इंडियाच्या व्यवस्थापकाला चपलेने मारहाण केली होती.
त्यांच्या या कृत्यानंतर एअर इंडियासह अन्य भारतीय विमान कंपन्यांनी त्यांच्यावर बंदी घातली होती. त्यांचा नो फ्लाय लिस्टमध्ये समावेश केला होता. आपल्या वर्तनाबद्दल गायकवाड यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांच्याकडे खेद व्यक्त केल्यानंतर त्यांच्या हवाई प्रवासावरील बंदी हटवण्यात आली. पण त्यानंतर गायकवाड यांनी विमानाऐवजी रेल्वेने प्रवास केला होता.
गुरुवारी त्यांनी प्रथमच हैदराबाद ते दिल्ली असा विमान प्रवास केला. शिवसेनेच्या खासदारांनीही लोकसभेत रवींद्र गायकवाड यांच्या बंदीवरुन जोरदार राडा केला होता. बंदी हटवली नाही तर, रालोअच्या बैठकीत सहभागी होणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला होता. या सर्व घडामोडींनंतर गायकवाड यांच्यावरील बंदी मागे घेण्यात आली.
दरम्यान गायकवाड यांनी एअर इंडियाच्या विमानात प्रवेश मिळाला असला तरी, एअर इंडियाने दिल्ली पोलिसांना पत्र लिहून गायकवाडांवर कारवाईला विलंब का होत आहे अशी विचारणा केली आहे. एअर इंडियाच्या व्यवस्थापकाला मारहाण केल्या प्रकरणी दिल्लीत गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेला महिना झाल्यानंतरही तुम्ही कोणतीही कारवाई करत नसल्याने कर्मचा-यांच्या मनोधौर्यावर परिणाम होत असल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.
काय आहे प्रकरण
खासदार रवींद्र गायकवाड संसदेच्या अधिवेशनासाठी एअर इंडियाच्या विमानाने पुण्याहून दिल्लीला निघाले होते. त्यांच्याकडे बिझनेस क्लासचे ओपन तिकीट होते. पण आपणास इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आल्याची त्यांची तक्रार होती. मात्र या विमानात बिझनेस क्लास नाही आणि केवळ इकॉनॉमी क्लासच आहे, याची कल्पना खा. गायकवाड यांच्या स्वीय सचिवाला देण्यात आली होती, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी नमूद केले.
विमानात आल्यानंतर आपल्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांशी वाद घालायला सुरुवात केली. विमान दिल्लीला उतरल्यानंतर सर्व प्रवासी विमानातून खाली उतरले. मात्र खा. गायकवाड विमानातून खाली उतरण्यास तयार नव्हते. त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. त्यावेळी खा. गायकवाड यांनी ६0 वर्षीय आर. सुकुमार या ड्युटी मॅनेजरला शिवीगाळ करीत चपलेने मारले.