तिरुवनंतपुरम : पुराच्या थैमानामुळे मोठी हानी झालेल्या केरळमध्ये आता स्थिती काहीशी पूर्वपदावर येत असून तिथे पंधरवड्यानंतर शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरु झाली. पुराचे पाणी घुसल्याने १४ आॅगस्टपासून बंद असलेला कोची विमानतळही सुरू झाला असून तेथे दुपारी दोन वाजता पहिले विमान उतरले.
घरे उद्धवस्त झाल्याने १० लाखांहून अधिक लोक विस्थापीत झाले. त्यांच्या पाल्यांना शाळा, महाविद्यालयांत जाणेही शक्य नव्हते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर तसेच पुराचे पाणी ओसरल्यानंतर राज्यातील शाळा, कॉलेजांची सफाई मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली. पाणी घुसल्याने अनेक शाळांच्या इमारतींचे व आतील फर्निचर तसेच पाठ्यपुस्तकांसह शालेय साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे.शिक्षणमंत्री प्रा. सी. रवींद्रनाथ यांनी सांगितले की, पुरामुळे राज्यातील ६५० शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातील काही शाळा उघडण्यास अजूनही उशीर लागणार असल्याने निवारा शिबिरांमध्येच मुलांचे वर्ग घेतले जात आहेत. मात्र येत्या ३ सप्टेंबरपासून सर्व शाळा पूर्वीप्रमाणेच सुरू होतील. अजूनही १.५ लाख विद्यार्थी निवारा शिबिरांमध्येच राहात आहेत. पुरामुळे ज्या मुलांची पाठ्यपुस्तके व गणवेश पूर्णपणे खराब झाले असतील किंवा हरवले असतील त्यांना ते नवे दिले जातील, असे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले आहे. बंद असलेल्या कोची विमानतळावर बुधवारी पहिले विमान दुपारी दोन वाजता उतरले. ते होते अहमदाबाद ते कोची या मार्गावरील इंडिगो कंपनीचे. त्यानंतर विमानांची नियमित ये-जा सुरु झाली.पूरग्रस्तांना केंद्राची मदत अपुरी - राहुलकेरळमधील पूरग्रस्तांना पुरेशी मदत न दिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, यूएईकडून केरळला मदत मिळण्याची शक्यता असून ती स्वीकारावी असे आपले मत आहे. जर पूरग्रस्तांना कोणी विनाशर्त मदत करत असेल तर ती घ्यायला काहीच हरकत नाही. राहुल गांधी केरळच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. पुरेशी मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेस केंद्र सरकारवर दबाव आणेल असेही त्यांनी पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांना सांगितले.